Latest

Chhagan Bhujbal : एकट्यालाच टार्गेट केल्यास राजकीय वास येईल! भुजबळांचे जरांगे-पाटील यांना प्रत्युत्तर

गणेश सोनवणे

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्यास माझा विरोध नाही. मात्र ओबीसी समाजाला आरक्षण खूप कमी आहे, त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, असे माझे म्हणणे आहे. माझ्या एकट्याचेच नव्हे, तर इतर अनेक नेत्यांचेही हेच मत आहे. त्यामुळे इतरांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाहीत?, असा सवाल करत, मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला, नाही तर त्याला राजकीय वास येईल, असे प्रत्युत्तर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांना दिले आहे. (Chhagan Bhujbal)

संबधित बातम्या :

मनोज जरांगे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे. सोमवारी (दि. २) माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी जरांगे यांच्या टीकेस प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देता कामा नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, नाना पटोले, अशोक चव्हाण यांचेसुद्धा मत आहे. मग मला एकट्याला का बोलता, माझ्या हातात काय आहे? ही सगळी मंडळी त्याच मताची आहेत, हे मला त्या जरांगेंना सांगायचे आहे. तुम्ही त्यांची नावे घेऊन बोलत का नाहीत? इशारे काय द्यायचे ते जरूर द्या, मात्र ही सगळी मंडळी त्याच मताची आहेत. या मताच्या विरोधात कुठला राजकीय पक्ष किंवा नेता आहे, हे सांगावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. ते म्हणाले की, ज्यावेळी फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा केला, त्यावेळी आमचासुद्धा पाठिंबा होता. दुसरीकडे ओबीसी घटकाला आरक्षण कमी असून, लोकसंख्या जास्त आहे. ओबीसीत पावणेचारशे जाती आहेत. १७ टक्के आरक्षण शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. त्यात काय अडचण झाली आहे, ती दूर करावी, एवढेच माझे म्हणणे आहे. हे माझ्या एकट्याचे मत नसून, सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal)

…तर मी धर्मविरोधी ठरलो असतो

सण-उत्सवांच्या मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर भुजबळ यांनीदेखील त्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, मी आधी या विषयावर बोललो असतो, तर धर्मविरोधी आहे असे आरोप झाले असते. लेझर आणि डीजेमुळे अनेकांना त्रास झाले आहेत. लोकांना जर इजा होत असेल, तर सर्वांनी याचा विचार करायला पाहिजे.

कांदा व्यापाऱ्यांनी हट्ट सोडावा

कांदा प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, मी सुरुवातीपासून कांदा व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचे आवाहन करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याकडे पाहावे. आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न केले आहेत. व्यापाऱ्यांनी आता जास्त हट्ट करणे योग्य नाही. सरकारच्या कामात कोणी अडथळे आणत असतील, तर पोलिस कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT