Latest

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराचे कसोटी संघातील स्थान धोक्यात, ‘हे’ 3 खेळाडू शर्यतीत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ (Team India) पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून होणार असून या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. यामध्ये पहिला बदल चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) रूपात होऊ शकतो. विंडिज दौऱ्यातून पुजाराला डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाने भारताला सलग दुस-यांदा हुलकावणी दिली. नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्यात (WTC Final) ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (Team India) 209 धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यानंतर अनुभवी फलंदाज पुजाराची (Cheteshwar Pujara) कारकीर्द संकटात सापडल्याचे चित्र आहे. डब्ल्यूटीसी फायनलच्या (WTC Final) दोन्ही डावांमध्ये त्याने अनुक्रमे केवळ 14 आणि 27 धावा केल्या. यापूर्वीच्या अनेक मालिकांमध्येही त्याची बॅट चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरत आली आहे. अशा परिस्थितीत पुजाराचे कसोटी करिअर संकाट सापडले आहे. निवडकर्ते आता त्याच्याकडे पाठ फिरवून त्याच्या जागी नव्या फलंदाजाला संधी देऊ शकतात. या जागेसाठी 3 फलंदाज शर्यतीत आहेत.

1. सरफराज खान (sarfaraz khan)

रणजी ट्रॉफीच्या मागील 3 मोसमात सरफराज खानने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या इतक्या धावा दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला करता आलेल्या नाहीत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने खळबळ माजवणाऱ्या सरफराजची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. मात्र आतापर्यंत त्याची एकदाही भारताच्या कसोटी संघात निवड झालेली नाही. सर्फराजने आपल्या कारकिर्दीत 37 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3505 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याची सरासरी 80 च्या आसपास आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर सरफराजला संधी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

2. हनुमा विहारी (Hanuma Vihari)

हनुमा विहारीने टीम इंडियासाठी 16 कसोटी सामने खेळले असून त्याने 839 धावा केल्या आहेत. मात्र विहारी बऱ्याच दिवसांपासून संघाबाहेर आहे. त्याने 113 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 8600 धावा जमा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याची सरासरी देखील 50 पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावरही त्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

3. श्रेयस अय्यर (shreyas iyer)

श्रेयस अय्यर बराच काळ टीम इंडियाकडून 5-6 व्या क्रमांकावर खेळत आहे. मात्र अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाल्यानंतर या खेळाडूला पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याने टीम इंडियासाठी 10 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 666 धावा निघाल्या आहेत. अय्यरने या कालावधीत 1 शतक आणि 5 अर्धशतके फटकावली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT