Latest

चेतेश्वर पुजाराने कर्णधार होताच लॉर्ड्सवर झळकावले शतक!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराची बॅट इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर तळपली. त्याने काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 च्या सामन्याच्या ससेक्स संघाचे नेतृत्व करत मिडलसेक्स विरुद्ध पहिल्या दिवशी नाबाद शतक झळकावले. सात काउंटी सामन्यांतील हे त्याचे पाचवे शतक आहे. टॉम हेन्सच्या अनुपस्थितीत पुजाराकडे संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. पुजारानेही या संधीचे सोने केले आणि कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केली. (Cheteshwar Pujara scores century)

खराब फॉर्ममुळे पुजारा टीम इंडियातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळायला गेला. ससेक्सकडून खेळताना त्याने चार शतके झळकावली. या शानदार खेळीच्या जोरावर पुजाराचे पुन्हा भारताच्या कसोटी संघात पुनरागमन झाले. इंग्लंड विरुद्ध एजबॅस्टन येथील एकमेव कसोटीसाठी तो टीम इंडियाचा भाग होता. त्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. पण तो सामना इंग्लंडने जिंकला. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या कसोटीनंतर पुजारा पुन्हा ससेक्स क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला आणि त्याने लॉर्ड्स मैदानावर मिडलसेक्स विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात हंगामातील पाचवे शतक झळकावले. (Cheteshwar Pujara scores century)

मिडलसेक्सचा कर्णधार टिम मुर्तग याने लॉर्ड्सवर पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून ससेक्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्यात ससेक्सच्या दोन्ही सलामीवीरांनी फारसे योगदान न देता विकेट गमावल्या आणि 34.2 षटकांनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 99 अशी झाली. यानंतर चेतेश्वर पुजाराने ससेक्सचा डाव पुढे नेला. बचावात्मक खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि संथगतीने धावफलक हलता ठेवणाऱ्या पुजाराने या सामन्यात काही आक्रमक आणि उत्कृष्ट शॉट्स खेळले. (Cheteshwar Pujara scores century)

पुजाराशिवाय टॉम अल्सोपचेही शतक

मिडलसेक्स संघासाठी पहिल्या सत्रातील सुरुवातीचा तासभराचा खेळ खूपच चांगला ठरला. त्यांच्या वेगवान गोलंदाजांनाही डावाच्या सुरुवातीला लॉर्ड्सच्या खेळपट्टीची भरपूर मदत मिळाली. सलामीवीर अलीला 25 चेंडूत 7 धावा करून मिडलसेक्सच्या कर्णधाराने बाद केले. तर टॉम क्लार्कला टॉम हेल्मने 84 चेंडूत 33 धावा करून बाद केले. यानंतर डावखुरा फलंदाज टॉम अल्सोप आणि पुजार याजोडीने संघाचा डाव सावरला. अल्सोपने 277 चेंडूत 135 धावा केल्या आणि तो 365 मिनिटे क्रीजवर राहिला. हेल्मने 93व्या षटकात अल्सोपला बाद करून तिसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. यानंतर पुजाराने वेगवान गोलंदाजांवर निशाणा साधला आणि दुसऱ्या टोकाकडून धावसंख्या वाढवली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजारा 182 चेंडूत 115 धावा करून नाबाद राहिला. तर संघाने 300 धावांचा टप्पा पार केला. पहिल्या दिवसअखेर ससेक्सने 96 षटकांत 4 गडी गमावून 328 धावा केल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT