Latest

Cheetahs Return To India : स्वागत चित्याचे; राजर्षी शाहू महाराजांच्या काळात चित्त्यांकडून शिकार

अमृता चौगुले

तत्कालीन मध्य प्रदेशातील बस्तरच्या जंगलात भारतातील अखेरच्या चित्त्याची शिकार झाली (Cheetahs Return To India) आणि गेल्या 70 वर्षांपासून भारतातील हा देखणा प्राणी नामशेष झाला. आता नामिबियातून (आफ्रिका) तीन नर आणि पाच माद्या असे आठ चित्ते शनिवारी भारतात दाखल झाले आहेत.

वन्यजीव साखळी या चित्त्यांमुळे मजबूत व्हायला मदत होणार आहे. वन्यप्राणीप्रेमींनी चित्त्यांच्या (Cheetahs Return To India) आगमनाचे स्वागत करणे स्वाभाविकच आहे. भारताच्या वायव्य दिशेला असलेल्या खिंडीतून चित्त्याचा भारतात प्रवेश झाला. प्राचीन साहित्यात चित्त्याचा उल्लेख आहे. घनदाट अरण्यापेक्षा मैदानी, सपाट प्रदेशातील जंगल चित्त्यांना अधिक मानवते. वाघ, सिंह, बिबट्या यांच्याप्रमाणे चित्ता हाही मार्जार कुळातील आहे. अतिशय चपळ, चतुष्पाद असे चित्त्याचे वैशिष्ट्य आहे. चित्त्याची लांबी शेपटीसह दोन ते अडीच मीटर असते.शेपटी 60 सें. मी. ते 75 सें. मी. एवढी असते. वजन 35 किलोपर्यंत असते. पिवळ्या कातडीवर गोल भरीव काळे ठिपके असतात. पाय लांब आणि नख्या थोड्या वाकड्या आणि बोथट असतात. मादीपेक्षा नर मोठा असतो.

मादी एकावेळी 3 ते 4 पिलांना जन्म देते. चित्ता हा सर्वाधिक वेगाने धावणारा प्राणी आहे. काही क्षणांत तो 80 ते 100 कि. मी. एवढ्या वेगाने धावू शकतो. पण या वेगाने तो 350 मीटरपर्यंतच धावू शकतो. तेवढ्यात भक्ष्य न मिळाल्यास तो ते सोडून देतो. छोटी हरणे, पक्षी, ससे, छोटे प्राणी हे चित्त्याचे खाद्य. प्रामुख्याने तो दिवसा शिकार करतो. क्वचितच तो रात्रीही शिकार करतो.

चित्ता आणि बिबट्या (Cheetahs Return To India)

चित्ता आणि बिबट्या यांच्यात नेहमी गफलत होते. चित्त्याला बिबटा समजले जाते; पण दोघांत फार फरक आहे. बिबट्याच्या तुलनेत चित्ता लहान असतो. चित्ता बिबट्यापेक्षा सडपातळ असतो. चित्त्याच्या अंगावरील ठिपके काळे व भरीव असतात. बिबट्याच्या अंगावरील ठिपके पोकळ असतात. बिबट्या झाडावर चढू शकतो.

चित्ता झाडावर चढत नाही. बिबट्याच्या नख्या तीक्ष्ण तर चित्त्याच्या बोथट असतात. दोघांच्या आवाजात, गुरगुरण्यातही फरक असतो. 70 वर्षांनंतर पुनरपि भारतात चित्त्याची पैदास होणार आहे. भारतीय जंगलांना पुन्हा जुने वैभव लाभणार ही वन्यप्राणी प्रेमिकांना खूशखबरच आहे

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात चित्त्यांकडून शिकार (Cheetahs Return To India)

राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी चित्तेवानांकडून शिकारीसाठी चित्ते तयार करून घेतले होते. रायबाग भागातील जंगलात अशा चित्त्यांकडून हरणांची शिकार केली जात. शिकारी चित्त्यांच्या डोळ्यावर झापड असे व बैलगाडीतून त्याला हरणांच्या कळपाकडे नेले जाई. शिकार टप्प्यात येताच चित्त्यांची झापड दूर केली जाई. क्षणार्धात चित्ता हरणाच्या पाठलागावर जाई. शिकार झाल्यावर चित्त्याला परत झापड बंद केले जाई. चित्त्याने अचूक काळविटाचीच शिकार करावी, असेही ट्रेनिंग चित्त्यांना देण्यात आलेले असे. राजर्षी शाहू महाराजांनी असे 35 / 40 चित्ते तयार केले होते. या चित्त्यांसाठी कोल्हापुरातील शिवाजी पार्कात विक्रम हायस्कूलजवळ चित्तेखाना नावाची इमारत उभारण्यात आली होती. सदरचा परिसर कित्येक वर्षे 'चित्तापार्क' याच नावाने ओळखला जात होता. (सध्या पंचशील हॉटेल आहे ती जागा व परिसर) चित्त्याला शिकारीसाठी तयार करणारे चित्तेवान अतिशय मेहनतीने आणि कौशल्याने चित्त्यांना ट्रेनिंग देत आणि तयार करत. संस्थान काळात दसर्‍याच्या शिलंगणाच्या मिरवणुकीत मोठ्या गाड्यावर बसलेले हे शिकारी चित्ते दिसत असत. सरदारखां चित्तेवान, इस्माईल रहिमान जमादार, धोंडी लिंबाजी पाटील हे राजर्षी शाहू महाराजांच्या काळातील प्रसिद्ध चित्तेवान होते. भावनगरचे महाराज हे राजर्षी शाहू महाराजांचे जिवलग मित्र. भावनगरला चित्त्याकडून शिकार केली जाई. शाहू महाराजांनी भावनगरला आपली माणसे पाठवून त्यांना चित्तेवान म्हणून तयार केले. शाहू महाराजांनी आफ्रिकेतूनही काही चित्ते मागवले होते.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT