Latest

Chandrayaan-3 Mission | ”स्वागत आहे, मित्रा!’ चांद्रयान-३ विषयी ‘इस्रो’ने दिली नवीन अपडेट

दीपक दि. भांदिगरे

Chandrayaan-3 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने चांद्रयान -३ मोहिमेबाबत महत्त्वाची माहिती अपडेट दिली आहे. चांद्रयान -३ चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. येत्या बुधवारी (दि.२३) रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यूल चंद्रावर उतरणार आहे. याचे थेट प्रक्षेपण बुधवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरु होईल, अशी माहिती 'इस्रो'ने दिली आहे.

दरम्यान, 'इस्त्रो'ने एक्सवर (ट्विटर) नवीन एक पोस्ट करत चांद्रयान-३ विषयी अपडेट दिले आहेत. "स्वागत आहे, मित्रा!' Ch-2 (चांद्रयान-२) ऑर्बिटरने Ch-3 च्या लँडर मॉड्यूलचे औपचारिक स्वागत केले. यातून दोघांमध्ये दुतर्फा संवाद प्रस्थापित होतो. 'इस्त्रो'च्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) कडे आता लँडर मॉड्यूल (LM) पर्यंत पोहोचण्यासाठी आणखी मार्ग आहेत." असे 'इस्त्रो'ने म्हटले आहेत.

चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी दोन दिवस बाकी असताना इस्रोने सोमवारी सांगितले की चांद्रयान-३ च्या लँडर मॉड्यूल (एलएम) शी दोन मार्गाने संपर्क प्रस्थापित झाला आहे. चांद्रयान-२ मोहिमेतील लँडर हरवले असले तरी PRADAN ऑर्बिटर सध्या चंद्राभोवती १०० किमी x १०० किमीच्या कक्षेत फिरत आहे. यामुळे आता लँडर मॉड्यूल (LM) पर्यंत पोहोचण्यासाठी आणखी मार्ग मिळाला आहे.

दरम्यान, इस्रोने आज सोमवारी सकाळी चंद्रावरील संभाव्य लँडिंग भागाची छायाचित्रे शेअर केली होती. ही छायाचित्रे चंद्राच्या दूरच्या भागाची असून ती लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्या (LHDAC) द्वारे टिपलेली आहेत. लँडर मॉड्यूलला चंद्राच्या पृष्ठभागावर दगड किंवा खोल खंदक नसलेल्या सुरक्षित ठिकाणी उतरण्यास हा कॅमेरा मदत करत आहेत, असे इस्रोने एक्सवरील पोस्ट नमूद केले आहे.

चांद्रयान-३ आता चंद्राच्या अगदी जवळच्या कक्षेत पोहोचले आहे. विक्रम लँडर रात्री उशिरा म्हणजेच सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले. या क्षणाला लँडरपासून चंद्र केवळ २५ किमी दूर होता. नंतर त्याने ठरल्याप्रमाणे कक्षा पुन्हा रुंदावत नेली. भारतीय वेळेनुसार बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडर चंद्रावर उतरण्याची प्रक्रिया सुरू होईल. याबाबतची अधिकृत माहिती 'इस्रो'ने रविवारी दिली होती.

लँडर चंद्राभोवती अंडवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. याआधी ते चंद्राच्या ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेत होते. यादरम्यान एका क्षणी बंगळूर येथील इस्रोच्या मुख्यालयातून दुसरे डीबूस्टिंग ऑपरेशन (लँडरचा वेग कमी करण्याची प्रक्रिया) राबविण्यात आले. या दुसर्‍या डिबूस्टिंग ऑपरेशननंतर चंद्राच्या ११३ किमी x १५७ किमीच्या कक्षेतून लँडर चंद्राच्या 25 किमी x १३४ किमी या अधिक
जवळच्या कक्षेत आला. आता ज्या कक्षेत लँडर आहे, त्यात चंद्राच्या किमान अंतराचा बिंदू २५ किमीवर, तर कमाल अंतराचा बिंदू १३४ किमीवर आहे. या कक्षेत फिरत असताना एका क्षणाला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याची (सॉफ्ट लँडिंग) प्रक्रिया सुरू होईल. बुधवारी (२३ ऑगस्ट) लँडरने चंद्राचे चुंबन घेतलेले असेल! लँडिंगपूर्वी लँडरकडून पृष्ठभागाची तपासणी केली जाईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरावयाच्या नियोजित ठिकाणावर ते उतरेल. अर्थात त्यासाठी लँडरला चंद्रावरील सूर्योदयाची प्रतीक्षा तेवढी असेल. (Chandrayaan-3 Mission)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT