Latest

चंद्रपूर : ब्रम्हपूरी तालुक्यात पट्टेदार वाघ जेरबंद; शेतशिवारात घेतला होता महिलेचा बळी

निलेश पोतदार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा ब्रम्हपूरी तालुक्यात धुमाकूळ घालून दहशत पसरविणाऱ्या एका पट्टेदार वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. ही घटना काल (सोमवार) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आवळगाव शेतशिवारात घडली. जेरबंद वाघाला चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रिंटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. वाघ जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव शेतशिवारात मागील काही दिवसांपासून एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला होता. आवळगाव येथील एका महिलेचा बळीही घेतला होता. त्यांनतरही वाघाचे शेतशिवारात शेतकऱ्यांना दर्शन होणे सुरूच होते. नागरिक, शेतकरी, शेतमजूरांमध्ये यामुळे प्रचंड दहशत पसरली होती. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत होती. पट्टेदार वाघामुळे आवळगाव परिसरातील नागरिकांच्या जिवितास धोका लक्षात घेता मुख्य वनजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी महिनाभरापूर्वीच आदेश दिले होते. तेंव्हापासून वनविभागाची त्या पट्टेदार वाघावर पाळत होती.

काल (सोमवार) ब्रम्हपूरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव उपवनक्षेत्र वांद्रा नियतक्षेत्रामध्ये कक्ष क्रमांक 1047 मध्ये पट्टेदार वाघ आढळून आला. यावेळी वाघाच्या मागावर असलेले डॉ. रविकांत खोब्रागडे, सशस्त्र पोलिस अजय मराठे व अन्य वनाधिकाऱ्यांच्या चमूने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाघाला डार्ट करून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला साडेसात वाजण्याच्या सुमारास एका पिंजऱ्यात सुरक्षितरित्या जेरबंद केले. यावेळी सहायक वनसंरक्षक के. आर. धोंडणे, वनक्षेत्रपाल आर.डी. शेंडे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे बी. आर. दांडेकर, एन. ए. मोहूर्ले, एस. पी. नन्नावरे, ए. बी. तिखट, ए. बी.कोरपे, ए.एम. दांडेक, राकेश आहुजा यांच्या चमूने पट्टेदार वाघला जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेतले.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT