Latest

Champa Shashti : आज चंपाषष्ठी, खंडेराय मंदिरांवर रोषणाई; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवाअवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या षडरात्रौत्सव अर्थात चंपाषष्ठी (Champa Shashti) सोमवारी (दि. १८) सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त शहर-परिसरात श्री खंडेरायाच्या मंदिरांना आकर्षक राेषणाई केली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगा-गोदाघाटावरील प्राचीन श्री खंडेराय मंदिरात चंपाषष्ठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी सोमनाथ बेळे यांच्या दिल्ली दरवाजा येथील निवासस्थानापासून ते मंदिरापर्यंत चांदीच्या टाकाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी बेळे यांच्या निवासस्थानी या टाकाची विधिवत पूजन तसेच रुद्रपाठ पठण करण्यात येईल. याशिवाय देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडी मंदिर, पंचवटीमधील पेठरोड तसेच आरटीओ कॉर्नर येथील खंडोबा मंदिरांमध्ये उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवान शंकरांचा अवतार असलेल्या श्री खंडेरायांचे षडरात्रौत्सव अर्थात नवरात्रोत्सवाला अधिक महत्त्व आहे. मणी व मल्ल या दैत्यांचा संहार करणाऱ्या श्री खंडेरायांचे नवरात्रोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा केला जातो. चंपाषष्ठीला सायंकाळी घरोघरी तळी भरण्यात येते. तसेच भगवान खंडेरायांना भरीत-भाकरी, कांदापात तसेच मिरची याचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो. त्यामुळे तळीसाठी आवश्यक पूजा साहित्य व भरताची वांगी खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती.

 हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT