Latest

Agniveer Recruitm : अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल! ITI-पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थीही पात्र

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Agniveer Recruitment Rule Change : केंद्र सरकारने अग्निवीर भरतीच्या नियमांमध्ये पुन्हा मोठा बदल केला आहे. यापुढे आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही या भरतीसाठी पात्र असतील असे केंद्राने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी तिन्ही सैन्य दलांमध्ये जवानांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली होती. यानंतर सरकारने नियमांमध्ये बदल केले आहेत.

अग्निवीर योजनेंतर्गत आतापर्यंत हजारो जवानांची भरती करण्यात आली आहे. प्रशिक्षणानंतर अनेक जवानांना पोस्टिंगही देण्यात आली आहे. आता आयटीआय-पॉलिटेक्निक पास आउट विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत. अग्निपथ भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी लष्कराने पात्रता निकषाची व्याप्ती वाढवली आहे. आयटीआय पॉलिटेक्निक उत्तीर्ण झालेले तांत्रिक शाखेतील विद्यार्थीदेखील यासाठी अर्ज करू शकणार आहेत. (Agniveer Recruitment Rule Change)

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पूर्व-कुशल तरुणांना विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच प्रशिक्षणाचा वेळही कमी होणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे. या मोठ्या बदलामुळे आता या भरतीमध्ये आणखी उमेदवार सहभागी होतील, असा विश्वास लष्कराला आहे.

असा करा अर्ज…

अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. भारतीय लष्कराने अग्निपथ योजनेअंतर्गत होणा-या भरतीसाठी 16 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे. 16 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवार अग्निवीर (जनरल ड्यूटी) (सर्व शस्त्र) साठी अर्ज करू शकतात. तर, अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र) साठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अग्निवीर लिपिक (स्टोअर कीपर) पदांसाठी किमान 60 टक्के गुणांसह 12वी पास अर्ज करू शकतात. अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी 8वी-10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. यात आयटीआय-पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थीही अर्ज करू शकतील.

ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन नोंदणी करायची आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 असून यानंतर निवड प्रक्रिया 17 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT