Latest

शुगर फ्री पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  फिटनेसच्या नावाखाली शुगर फ्री किंवा कृत्रिम गोड पदार्थांचा आजकाल सर्रास वापर केला जातो. मधुमेही रुग्णांच्या आहारातही शुगर फ्रीचा समावेश असतो. मात्र, सातत्याने कृत्रिम गोड पदार्थांचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो, अशा आशयाचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेकडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. दररोजचे पदार्थ, चहा, कॉफीसारखी पेये, डाएट कोक, शुगर फ्री मिठाई, ज्यूस, दही, कोल्ड्रिंक, एनर्जी बार, शुगर फ्री आईस्क्रीम अशा अनेक पदार्थांमध्ये कृत्रिम स्वीटनरचा वापर केलेला असतो. यामध्ये 'एस्पार्टम' नावाचा घटक असतो.
या घटकाची चव साखरेपेक्षा अनेक पटींनी गोडसर असते. बाजारात मिळणार्‍या अनेक गोड पदार्थांमध्ये साखरेला पर्याय म्हणून 'एस्पार्टम'चा वापर केला जातो. शुगर फ्री पदार्थांमधील हा घटक यकृतामध्ये गेल्यावर त्याचे रूपांतर मिथेनॉल फार्मल अ‍ॅसिडमध्ये होते आणि त्यामुळे तोंडाचा, पोटाचा, गर्भाशयाच्या कॅन्सरचा  धोका वाढतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा कर्करोगविषयक विभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन यंत्रणेने याबाबत अभ्यास केला आहे. 'एस्पार्टम'चे किती प्रमाण कशा प्रकारे घातक ठरू शकते, याबाबत अधिक बारकाईने संशोधन केले जात आहे. अधिक सखोल अभ्यास करून या घटकावर बंदी आणण्याबाबत संघटनेकडून पावले उचलली जाऊ शकतात, असे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गोड पदार्थ बंद करण्याची सवय 
शरीराला हळूहळू लावून घेता येते. त्यामुळे कोणताही पदार्थ एकदम बंद करण्यापेक्षा त्याचे प्रमाण 
हळूहळू कमी करीत नेणे केव्हाही चांगले. डॉक्टर सहसा रुग्णांना कृत्रिम स्वीटनर वापरण्याचा पर्याय सुचवत नाहीत. गोड खाण्याची इच्छा झाल्यास खजूर बिया, मध, फळाची एखादी फोड, असे पर्याय अवलंबले जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. त्यामुळे कृत्रिम पदार्थांचे स्वतःच्या शरीरावर प्रयोग न करणे केव्हाही चांगले. नैसर्गिक घटक शरीरासाठी कायम चांगले असतात.
                                                                                – डॉ. आरती शहाडे, मधुमेहतज्ज्ञ
गोड पदार्थांची सवय हळूहळू सुटू 
शकते. चहा-कॉफीमध्ये साखरेऐवजी दालचिनीचा वापर करता येतो. अनेक वर्षे सातत्याने कृत्रिम स्वीटनरचा वापर केल्याने कर्करोगाचा धोका वाढतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. कृत्रिम स्वीटनरऐवजी स्टीव्हिया या तुळशीसारख्या वनस्पतीच्या हिरव्या पानांची पावडर वापरता येऊ शकते अथवा बिनसाखरेचे पदार्थ केव्हाही उपयुक्त असतात.
                                                                                 – डॉ. चंद्रकांत शहाडे, मधुमेहतज्ज्ञ 
हे ही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT