Latest

दूध भेसळखोरांविरोधात मोहीम; दुग्ध व्यवसाय विभागाचे सचिव तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाने सोमवारपासून (दि. 21) कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून, विभागाच्या अधिकार्‍यांची जिल्हानिहाय पथके तैनात करून दूध भेसळखोरांना अटकाव करण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे दुग्ध विकास विभाग आता दूध भेसळ रोखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडवर आला आहे.
राज्यात दुधात होणार्‍या भेसळीबाबत सातत्याने तक्रारी आणि निवेदने मंत्रालय स्तरावर प्राप्त होत आहेत. मध्यंतरी याबाबत झालेल्या विविध जिल्ह्यांतील कारवायांवरूनही दूध भेसळीचे लोण कोणत्या जिल्ह्यात आणि गावागावांमध्ये आहे, याची माहितीच झालेल्या कारवायांमधून समोर आली होती. मात्र, अशी भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबविण्यासाठी शुक्रवारी (दि.18) मंत्रालयात मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त श्रीकांत शिपूरकर, उपायुक्त प्रशांत मोहोड यांच्यासह राज्यातील जिल्हा दुग्ध विकास अधिकारी व प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये त्यांनी भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती दुग्ध आयुक्तालयातून देण्यात आली.
दूध भेसळ नियंत्रणासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने जिल्हावार धडक मोहीम घेण्याबाबतच्या सूचना सचिव मुंढे यांनी दिल्या आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा गैरप्रकार दिसून आल्यास संबंधित अधिकार्‍यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या सूचनांन्वये राज्यातील बाजारपेठेत भेसळीचे दूध येण्यापासून रोखणे यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हानिहाय अधिकार्‍यांची फिरती पथके तैनात करण्यात येत असून, भेसळखोरांवर कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– प्रशांत मोहोड, दुग्ध व्यवसाय विकास उपायुक्त  (प्रक्रिया व वितरण), दुग्ध आयुक्तालय, वरळी, मुंबई. 
हेही वाचा :
SCROLL FOR NEXT