Latest

‘फुले-शाहू-आंबेडकर-आम्ही सारे दाभोळकर’ ; मशाल प्रज्वलित करून डॉ. दाभोलकरांना अभिवादन

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'आवाज दो – हम एक है, लडेंगे जितेंगे', 'दहा वर्षे खुनाची – कार्यरत विवेकी असंतोषाची', 'फुले- शाहू- आंबेडकर – आम्ही सारे दाभोलकर', 'हिंसा के खिलाफ – मानवता की और' या घोषणा देत मेणबत्या आणि मशाल प्रज्वलित करून कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना 10 व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अभिवादन केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा हत्या करण्यात आलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्मृतिजागर व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पावसात उभे राहून कार्यकर्त्यांनी गाणी, घोषणा आणि मनोगताद्वारे अभिवादन केले.

महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, पुणे जिल्हाध्यक्ष मानव कांबळे, विचारवंत आनंद करंदीकर, प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी अभिवादन मनोगत व्यक्त केले. 'दाभोलकरांची हत्या होऊन साडेतीन हजार दिवस झाले. आमचा माणूस तर गेलाच, पण त्यांच्या मारेकर्‍यांवर कारवाई करून समाजात कायदा-सुव्यवस्था नांदते हे सांगण्यात केंद्र – राज्य सरकार आणि तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. कारवाईच्या मागणीसाठी दाभोलकरांच्या वैचारिक वारसदारांनी मोठा पाठपुरावा केला आहे, त्यामुळे सरकारने कार्यकर्त्यांचा अंत पाहू नये,' असा इशारा मानव कांबळे यांनी दिला.

अनिल करवीर, परिक्रमा खोत, माधुरी गायकवाड, राहुल उजागरे, अनिल दरेकर, स्वप्नील मानव यांनी गाणी सादर केली. मेणबत्त्या आणि मशाल पेटवून कार्यकर्त्यांनी दाभोलकरांना अभिवादन केले. महा.अंनिससह विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. डॉ. ठकसेन गोराणे यांनी प्रास्ताविक, तर विशाल विमल यांनी सूत्रसंचालन व समारोप केला.

आज मूक मोर्चा, निर्धार मेळावा
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे रविवारी (दि. 20) सकाळी सात वाजता डॉ नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळी अभिवादन व परिवर्तनवादी गीते सादर केली जातील. अभिवादन झाल्यावर पुलापासून एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 9.30 ते 1.30 या वेळेत एस. एम. जोशी सभागृहात राज्यस्तरीय विवेकी निर्धार मेळावा आयोजित केला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT