Latest

अहमदनगर जिल्ह्यातील तिसर्‍या दिवशीही बससेवा विस्कळीत

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाची बससेवा सलग तिसर्‍या दिवशी सोमवारी ठप्प होती. दुपारनंतर ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, कल्याण, नाशिक आदी ठिकाणी बस सोडण्यात आल्या आहेत. शेवगाव येथे आंदोलन असल्यामुळे या आगारातून दिवसभरात एकही बस सोडली गेली नाही. इतर 10 आगारांतून बससेवा सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने बस सोडल्या जात आहेत. मंगळवारपासून बससेवा पूर्ववत सुरू होईल, असे अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपासून बससेवा बंद असल्यामुळे सोमवारी विद्यार्थी, नागरिक बसस्थानकांकडे फिरकले नाहीत. त्यामुळे नाशिक, शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, आळेफाटाकडे जाण्यासाठी सोडलेल्या बस रिकाम्याच धावल्या आहेत.

मराठा उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. खबरदारी म्हणून जिल्हा पोलिस प्रशासनाने बससेवा ठप्प ठेवण्याचे निर्देश एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाला दिले होते. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी जिल्हाभरातील 585 बस आगारांतच उभ्या होत्या. पहिल्या दोन दिवसांत अहमदनगर विभागाला दोन कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.

जालना लाठीमाराच्या तिसर्‍या दिवशी सोमवारीदेखील बससेवा बंदच असणार असे गृहीत धरून अनेकांनी घरीच थांबणे बंद केले. त्यामुळे सोमवारी नगर शहरासह तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानकांत शुकशुकाट होता. तारकपूर बसस्थानकातून दुपारी पुणे, कल्याण, मुंबई आदी ठिकाणी बस सोडण्यात आल्या. जिल्हांंतर्गत नगर-पारनेर, नगर-श्रीरामपूर, संगमनेर अशा तालुका ठिकाणच्या शटल बसदेखील सुरू झाल्या आहेत.

शेवगाव येथे सोमवारी आरक्षणाबाबतचा मोर्चा असल्यामुळे तेथील बसस्थानकातून दिवसभरात एकही बस सोडली गेली नाही. कोपरगावात आंदोलन असल्याने धुळे, चोपडा आदी ठिकाणी देखील बस सोडली गेली नाही. मराठवाडा भागातील औरंगाबाद, जालना, गेवराई आदी ठिकाणी बस सोडली गेलेली नाही. मंगळवारपासून जिल्हाभरातील बससेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचे विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी सांगितले.

एसटी महामंडाळाला आर्थिक फटका

सोमवारी काही प्रमाणात ग्रामीण भागातील बससेवा सुरू झाली आहे. पुणे, मुंबई, कल्याण, नाशिक, संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर, राहुरी आदी ठिकाणी बससेवा सुरू झाली. मात्र, बसस्थानकांत शुकशुकाट असल्यामुळे बस रिकाम्याच धावल्या गेल्या. दिवसभरात जवळपास एक हजार फेर्‍या झाल्या आहेत. त्यामुळे तिसर्‍या दिवशी देखील अहमदनगर विभागाला 50 ते 55 लाखांपेक्षा अधिक आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT