बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष आता गुद्यांवर गेला आहे. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला करून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला करण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले यांच्या हस्ते जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्क प्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला.
जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की, हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी कार्यकर्ते आघाडीवर होते. याबाबत व्हिडिओ फुटेज उपलब्ध झाले आहेत. ज्यात कुणाल गायकवाड स्पष्ट दिसत आहेत. जवळपास 15 मिनिटे हा दादागिरीचा प्रकार सुरू होता.
यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक केली. आणि शिवसेना पदाधिका-यांना लाथाबुक्क्या मारल्या. उपजिल्हा प्रमुख संजय हाडे यांच्या पोटात लाथ मारण्यात आली. तसेच सहसंपर्क प्रमुख छगन मेहेत्रे यांनाही मारहाण झाली. हल्ल्याच्या या घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. मात्र हल्ला करून शिंदे गटातील कार्यकर्ते पसार झाले. दरम्यान, यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला करण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
हेही वाचलंत का ?