Latest

बुलढाणा : सिंदखेडराजाच्या नामांतरासाठी शासनस्तरावर हालचाली; पण स्थानिकांचा विरोध 

स्वालिया न. शिकलगार

बुलढाणा : विजय देशमुख – राज्यात नुकतेच औरंगाबाद आणि उस्मानाबाद या ऐतिहासिक शहरांचे नामांतर होऊन अनुक्रमे 'छत्रपती संभाजीनगर' व 'धाराशिव' असे नवे नामकरण झाले आहे. याच दरम्यान राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजा (जि. बुलढाणा)या ऐतिहासिक शहराचे नामांतर करून 'मातृतीर्थ जिजाऊ नगर' असे नामकरण करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे नुकताच पाठवला आहे. मात्र या प्रस्तावाला सिंदखेडराजा येथील स्थानिकांनी आणि लखुजीराव जाधवांच्या काही वंशजांनी विरोध दर्शविला आहे. प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

एरव्ही एखाद्या गावाच्या, शहराच्या नामांतराचा विषय आला की शासन, प्रशासन स्तरावर मोठा संघर्ष, खटाटोप करत क्लिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. पण सिंदखेडराजा शहराच्या नामांतराबाबत राज्य शासनाने प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनाला तसा प्रस्ताव पाठविण्याचे सुचित केले होते. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी सिंदखेडराजा शहराचे नवे नामकरण 'मातृतीर्थ जिजाऊनगर' करण्याचा प्रस्ताव अमरावतीच्या विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवला आहे. सिंदखेडराजा शहराला जिजाऊंचे नाव देण्याची मागणी अधूनमधून व्हायची. परंतू ती मागणी कुणी जोरकसपणे केली नव्हती.

दरम्यान देऊळगावराजा तालुक्यातील संतोष बंगाळे पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने २०१७ मध्ये महायुतीच्या सरकारकडे एक निवेदन देऊन सिंदखेडराजा शहराचे 'मातृतीर्थ जिजाऊनगर'असे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने ११ फेब्रुवारी२०१९रोजीच्या पत्रान्वये बुलढाणा जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव तयार करण्याचे सांगितले होते.

दरम्यान कोरोना महामारीमुळे प्रस्तावाची कार्यवाही थांबली होती. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा विषय ऐरणीवर आला. त्याचवेळी सिंदखेडराजाच्या नामांतराच्या प्रस्तावाला शासनस्तरावर चालना मिळाली. त्यानुसार तहसिलदार सिंदखेडराजा यांनी गृह विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करून डिसेंबर २०२२ मध्ये जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी, २०२३ रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे हा प्रस्ताव पाठवला. याबाबतची माहिती संतोष बंगाळे पाटील या कार्यकर्त्याने देऊळगावराजा येथे पत्रकार परिषद घेऊन दिली. जिल्हा प्रशासनानेही या माहितीला दुजोरा दिला.

लखुजीराव जाधवांचे १३वे वंशज यांनी सिंदखेडराजा शहराच्या नामांतराच्या प्रस्तावाला जाधव वंशकुळाचा विरोध असल्याची भूमिका प्रथम मांडली. 'लखुजीराव जाधवांपासून सिंदखेडराजा हे नाव असल्याने ते बदलायचे नाही' हा सूर सिंदखेडराजाच्या स्थानिकांनी व काही राजकीय पक्ष आणि संघटनांनीही ओढला. शासनाने नामांतराचा प्रस्ताव रद्द करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देणारे निवेदनही सिंदखेडराजाच्या तहसिलदारांना देण्यात आले आहे.

'मातृतीर्थ जिजाऊनगर'असे नामकरण करायचेच असेल तर सिंदखेडराजा शहराचे नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याचे करा. असा सल्लाही याच निवेदनकर्त्यांनी दिला आहे. सिंदखेडराजा शहरातील निळकंठेश्वर या ११व्या शतकातील मंदिराच्या शिलालेखात या शहराचा उल्लेख 'सिद्धपूर' तर राजे लखुजीराव जाधव यांच्या १६व्या शतकात बांधलेल्या समाधीस्थळावरील शिलालेखात 'सिंदखेड' असा उल्लेख आहे. हे ऐतिहासिक नाव असल्याने ते बदलू नये अशी नामांतराला विरोध करणाऱ्यांची भूमिका आहे. शहराला जिजाऊंचे नामकरण विनासायास प्रस्तावित असतांना त्याला विरोध करण्यासाठी सिंदखेडकर पुढे आले आहेत. एकूणच 'मातृतीर्थ जिजाऊनगर' नामकरणाचा प्रस्ताव वादात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT