२२ दिवसांपासून देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांना गावाची ओढ लागली होती. यात्रा प्रमुखांनी उद्या (दि. २९) गावात पोहोचणार असल्याचा निरोपही दिला. मात्र मलकापूर नजीक बसला अपघात झाला. यामध्ये यात्रा प्रमुखासह सहा जण ठार झाले. उर्वरित जखमी अवस्थेत रूग्णालयात दाखल आहेत. यामुळे जिल्ह्यातून शेकडोजण आपल्या नातेवाईकांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील शिवाजी धनाजी जगताप काही वर्षांपासून दरवर्षी खासगी बसने अमरनाथ यात्रा काढायचे. यंदाही भांडेगाव, लोहगाव, जयपूर, डिग्रस कऱ्हाळे, साटंबा आदी गावातील भाविकांनी यात्रेसाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातून जवळपास ४० जणांनी १० जुलै रोजी त्यांची धार्मिक यात्रा सुरू केली होती. शेगावमध्ये गजानन महाराजांचे प्रथम दर्शन घेतले होते. त्यानंतर मुक्ताईनगर, अमृतसर, वाघा बॉर्डर, ओंकारेश्वर, उज्जैन, मथुरा येथे जाऊन ते परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. घरापासून जवळपास २०० कि.मी. अंतरावर मलकापूर शहरानजीक त्यांची बस आली होती. गावाकडे परत येत असल्याचा तसा नातेवाईकांना निरोपही होता. दरम्यान, शनिवारी पहाटे घरी पोहचणार तोच त्यांच्या खासगी बसला मलकापूर नजीक रेल्वे उड्डाणपूला जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नागपूर येथून नाशिककडे जाणाऱ्या एका खाजगी बसने समोरासमोर धडक दिली. या अपघातात खासगी प्रवाशी बस अक्षरश: चालकाच्या बाजूने चिरत गेली. यात ६ भाविक ठार झाले असून जवळपास २० जण जखमी झाले आहेत. यातील पाच जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, भाविक देवदर्शनाहून काही वेळातच घरी परतणार तोच नातेवाईकांना भल्या पहाटे अपघाताची माहिती मिळाली. ही घटना समजताच नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. ही माहिती जिल्हाभरात पसरल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सहा जण ठार झाले. यात बसचालक संतोष आनंदराव जगताप (रा. भांडेगाव), राधाबाई सखाराम गाडे (रा. जयपूर), अर्चना गोपाल घुकसे, सचिन शिवाजी महाडे (दोघेही रा. लोहगाव), शिवाजी धनाजी जगताप (रा. भांडेगाव) कानोपात्रा गणेश टेकाळे (रा.सिंदगीनागा) यांचा समावेश आहे. कानोपात्रा टेकाळे यांना गंभीर अवस्थेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयत हलविण्यात आले असता त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघातामधील जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. यात मेनका विष्णु खुळे (३०, रा. लोहगाव), द्वारकाबाई गजानन रोडगे (३०, रा. जामरून), महादेव संभा रणबळे (५०, रा. खंडाळा), गंगाराम गीते (६३, रा. सिंदगीनागा), संतोष भिकाजी जगताप (५४, रा. भांडेगाव), भगवान नारायन गिते (४८, रा. सिंदगीनागा), राधा नाथा घुकसे (३२, रा. लोहगाव), लिलाबाई एकनाथ आसोले (३३, रा. काळेगाव), पार्वती काशिनाथ ठोकळे (६०, सेनगाव), बद्रीनाथ संभाजी कऱ्हाळे (५४, रा. डिग्रस कऱ्हाळे), गिरीजाबाई बद्रीनाथ कऱ्हाळे (५०, रा. डिग्रस कऱ्हाळे), बेबीताई कऱ्हाळे (५०, रा. डिग्रस कऱ्हाळे), हनुमंत संभाजी फाळके (२६, जयपूर), काशीराम महाजी गिते (४०, रा. सेनगाव), भागवत पुंजाजी फाळके (२८, रा. जयपूर वाडी), किसन नामाजी फसाटे (६०, रा. सिंदगीनाका), गणेश शिवाजी जगताप (३८, रा. भांडेगाव), उमाकांत महादजी येवले (३९, रा. शिवनी, ता. सेनगाव) यांचा समावेश आहे. जखमीपैकी बेबीबाई बद्रीनाथ कऱ्हाळे आणि गिरजाबाई बद्रीनाथ कऱ्हाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा