बरेली (उत्तर प्रदेश) : पुढारी ऑनलाईन; लग्नमंडपात सर्वांसमोर नवरीचे चुंबन घेण्याची पैज (Groom kisses Bride) नवऱ्या मुलाला महागात पडली आहे. लग्नमंडपात स्टेजवर वर मुलाने नववधूचे चुंबन घेतले. नवऱ्या मुलाच्या या कृत्यामुळे वधूने तिचे लग्न मोडल्याचा प्रकार घडला. सुमारे ३०० वर्हाडींसमोर हा प्रकार घडला. या जोडप्याने एकमेकाला वरमाला घातल्यानंतर लगेचच नवऱ्याने नवरीचे आश्चर्यकरित्या चुंबन घेतले. सर्वासमोर हा प्रकार घडल्याने वधू ताबडतोब लग्नमंडपात निघून गेली आणि नंतर तिने पोलिसांना बोलावले. उत्तर प्रदेशातील संभल येथे ही घटना घडली आहे.
२३ वर्षीय पदवीधर असलेल्या तरुणीने सांगितले की नवऱ्या मुलाने त्याच्या मित्रांसोबत लावलेली पैज जिंकण्यासाठी तिचे चुंबन घेतले आणि त्याच्या चारित्र्याबद्दल मला संशय आहे. असे सांगत तिने लग्न मोडले आणि पाहुणे मंडळी घरी परतली. या प्रकारानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण वधूने लग्नास नकार दिला.
नवरी मुलीने पोलिसांना बोलावल्यानंतर दोन्हीकडील वर्हाडी मंडळींना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिने पोलिसांना सांगितले, "लग्न मंडपात असताना स्टेजवर तो मला अयोग्यरित्या स्पर्श करत होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर त्याने काहीतरी अनपेक्षित केले. यामुळे मला धक्का बसला आणि अपमानित झाल्यासारखे वाटले. त्याने माझ्या स्वाभिमानाची पर्वा केली नाही आणि पाहुण्यांसमोर अयोग्य कृत्य केले. भविष्यात तो असाच वागला तर? यामुळे मी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला."
जावई आणि त्याच्या मित्रांनी आम्हाला चिडवले होते आणि आता माझ्या मुलीला त्याच्यासोबत जायचे नाही. तरीही आम्ही तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्यास तयार नाही, असे मुलीच्या आईने म्हटले आहे. स्टेजवर चुंबन घेण्याचा प्रकार घडण्याआधीच जोडप्याचे लग्नविधी पार पडले होते. तरीही तिने २६ वर्षीय वरासोबत जाण्यास नकार दिला आहे.
याआधी शाहजहानपूर आणि लखीमपूर खेरी येथे वरांनी नागीन डान्स केल्याने दोन लग्ने मोडली होती. आता वराने लग्नमंडपात नवरीचे चुंबन घेतल्याने लग्न मोडले आहे. (Groom kisses Bride)
हे ही वाचा :