पुढारी ऑनलाईन : सहा वेळा विश्वविजेती आणि २०१२ च्या ऑलिम्पिकची पदक विजेती दिग्गज भारतीय बॉक्सर एमसी मेरी कोमने (Indian boxer Mary Kom) बॉक्सिंगगमधून निवृत्ती जाहीर केल्याचे वृत्त बुधवारी समोर आले होते. यावर मेरी कोमने मोठा खुलासा केला आहे. मेरी कोमने आज गुरुवारी (दि. २५) सांगितले की मी अद्याप निवृत्ती घेतलेली नाही.
बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतल्याच्या वृत्ताचे तिने खंडन केले आहे. बुधवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात तिने केलेल्या विधानावर आज गुरुवारी स्पष्टीकरण दिले. वयोमर्यादेमुळे ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकत नसल्याची खंत मेरी कोमने व्यक्त केली आहे.
मेरी कोमने दिलेल्या माहितीनुसार, एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, सर्वोच्च स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची तिची इच्छा असूनही वयाच्या मर्यादेमुळे तिला खेळ सोडावा लागत आहे. दरम्यान, ४१ वर्षीय मेरी कोमने खुलासा करताना म्हटले आहे की, माझे विधान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले. मी स्पर्धा सुरू ठेवण्यासाठी फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे.
मेरी कोमने एका निवेदनात म्हटले आहे की, "मीडियातील प्रिय मित्रांनो, मी अद्याप माझ्या निवृत्तीची घोषणा केलेली नाही आणि माझे विधान चुकीचे पद्धतीने घेण्यात आले. मला जेव्हा निवृत्तीची घोषणा करायची असेल, तेव्हा मी स्वतः मीडियासमोर येईन."
"मी निवृत्तीची घोषणा केली आहे आणि हे खरे नाही, असे सांगणारे काही मीडिया रिपोर्ट्स मी पाहिले आहेत.
"मी २४ जानेवारी २०२४ रोजी दिब्रुगढमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथे मी म्हणाले, "मला अजूनही खेळात यश मिळवण्याची इच्छा आहे पण ऑलिम्पिकमधील वयोमर्यादा मला भाग घेण्याची परवानगी देत नाही. तरीही मी खेळत राहीन. त्यासाठी मी अजूनही माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे आणि जेव्हा मी निवृत्तीची घोषणा करेन तेव्हा मी सर्वांना कळवीन.
मेरी कोमने २०१९ मध्ये जागतिक चॅम्पियनशिप जिंकली होती. हे तिचे ८ वे पदक होते आणि त्यामुळे ती जागतिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणारी बॉक्सर बनली. २०२१ मध्ये आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने कांस्यपदक जिंकून वापसी केली होती.
हे ही वाचा :