पुढारी ऑनलाईन डेस्क: 'कोविड सेंटर घोटाळा'प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. कोविड महामारीत ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारण्यात झालेल्या घोटाळा प्रकरणी अज्ञात BMC अधिकारी आणि कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (BMC Covid Scam)
कोविड-१९ च्या महामारीच्या काळात ९ नागरी रूग्णालये आणि २ जंबो कोविड सेंटमध्ये हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारताना अनियमितता केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. (BMC Covid Scam)
यापूर्वी काेराेना महामारीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कोविड -१९ केंद्रांमधील कथित अनियमिततेशी संबंधित प्रकरणाच्या संदर्भात मुंबईच्या आयकर तपास शाखेने अनेक शहरांमध्ये छापे टाकले हाेते. यामध्ये मुंबई, गुजरात, प्रयागराज, दिल्ली आणि पुण्यात डझनभर ठिकाणी ही छापेमारीची कारवाई करण्यात आली होते. कोविड काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेने करार केलेल्या अनेक कंपन्यांवर तसेच काही ठिकाणांवरही हे छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी X वर पोस्ट करत दिली हाेती. मुंबईतील ऑक्सिजन प्लांट्स आणि कोव्हिड रुग्णालयांतील घोटाळ्याशी संबंधित बीएमसीच्या कंत्राटदारांवर आयकर विभागाने मुंबई, अहमदाबाद, पुणे आणि उत्तर प्रदेशात छापे टाकले असल्याचे सोमय्यांनी म्हटले होते. हिसाब तो देना पडेगा! असेही शेवटी त्यांनी म्हणत सूचक इशारा दिला होता. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि डॉ. किशोर यांना अटक केली होती.