Latest

भाजपला सोलापुरात मोठे खिंडार; BRS प्रवेशासाठी १०० गाड्यांचा ताफा हैदराबादला रवाना

मोहन कारंडे

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात नुकतीच मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी करण्यात भाजप यशस्वी ठरला असला तरी सोलापूरात मात्र भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. कार्यकर्त्यांची भाजप सोडण्याची मालिका थांबता थांबत नाही, असे चित्र आहे. सोलापुरातून भाजप कार्यकर्त्यांच्या १०० गाड्यांचा ताफा हैदराबादच्या दिशेने रवाना झाला आहे. यामुळे राज्यात भाजपमध्ये इनकमिंग होत असताना सोलापूरात मात्र आऊटगोइंग सूरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

गेल्या दोन वर्षात सोलापूर भाजपमध्ये आऊटगोइंग जोरात सुरू आहे. विशेषतः भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नगरसेवक व पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता आहे. माजी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, माजी सरचिटणीस बिज्जू प्रधाने, माजी विरोधी पक्षनेता रमेश व्हटकर, माजी नगरसेवक बापू ढगे यांच्यासह अनेक शक्तिकेंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी पक्षाचा त्याग केला असून आज भाजपचे माजी खासदार व ज्यांनी पक्ष तळागाळात पोहोचवला त्या लिंगराज वल्याळ यांचे सुपुत्र नगरसेवक नागेश वल्याळ यांच्यासह ५ नगरसेवक बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भवानी पेठ, विडी घरकुल भागातील शेकडो कार्यकर्ते बीआरएसमध्ये जाणार असून याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसणार आहे. यावर शिस्तप्रिय म्हणणाऱ्या भाजपने आत्मचिंतन करण्याची गरज असून सोलापूरात एकाधिकार मालकशाहीला कंटाळून पक्ष सोडण्याची सुरू असलेली मालिका थांबवण्याचे आवाहन पक्षश्रेष्ठींसमोर आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT