Latest

Lok Sabha polls 2024 : पंजाबमध्‍ये भाजप-अकाली दल युतीची चर्चा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणूक जाहीर होताच नवे मित्र आणि नव्‍या युतीसाठीच्‍या चर्चेला उधाण आले आहे. पंजाबमध्‍ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांच्यात पुन्हा युतीची चर्चा सुरू झाली आहे, पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागांसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. ( Lok Sabha polls 2024 )

पंजाबमधील भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते आणि प्रवक्‍ते एसएस चॅनी यांनी 'इंडिया टुडे' शी बाेलताना सांगितले की, "पंजाबमध्‍ये दोन्‍ही पक्षाची युतीसाठी चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय होण्‍यास थोडा वेळ लागेल. 22 मार्चला अकाली दलाची कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर भाजप आणि अकाली दल यांच्यात औपचारिक बैठक होईल. यानंतर युतीबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे पक्षश्रेष्‍ठी घेतील." ( Lok Sabha polls 2024 )

शिरोमणी अकाली दल (एसएडी) च्या कोअर कमिटीची बैठक चंदीगडमध्ये होणार आहे. अकाली दलाचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस डॉ दलजीत सिंग चीमा यांनीही या बैठकीत निवडणूक आघाडीसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, याला दुजोरा दिला आहे. कोअर कमिटीची बैठकीत सर्व मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली जाते. समविचारी राजकीय पक्षाबरोबर होणार्‍या युतीबाबतही चर्चा होईल, असेही ते म्‍हणाले.

२०१९ लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील १३ लोकसभा मतदारसंघांमध्‍ये 8 जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. तर भाजप आणि शिरोमणी अकाली दलास प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. आम आदमी पार्टी (आप) एक जागा मिळाली होती. २०२०मध्‍ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप याच्‍यातील युती संपुष्‍टात आली होती. केंद्र सरकारच्‍या कृषी कायद्याला विरोध करत शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)तून बाहेर पडत असल्‍याचे जाहीर केले होते.

आता शिरोमणी अकाली दलाने 'वन नेशन, वन इलेक्शन' आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आीदंना पाठिंबा दिला आहे. त्‍यामुळे भाजप आणि शिरोमणी अकाली दलात पुन्‍हा युती होईल, अशी चर्चा पंजाबच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT