पुढार ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री ठाकरे यांची शनिवारी झालेली सभा एक 'लाफ्टर शो'च होता. कालचा 'लाफ्टर शो' शेवटपर्यंत संपलाच नाही. हनुमान चालिसा आमच्या मनात आहे. हनुमान चालीसा पठन करणार्यांवर गुन्हे दाखल होतात. त्यांना अटक केली जाते. मात्र संभाजी महाराज यांची हत्या करणार्या औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकविणे गुन्हा नाही का, असा सवाल करत विरोधी पक्ष नेते यांनी देवंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित भाजप हिंदी भाषिक संकल्प संमेलन आणि उत्तर सभेत ते बोलत होते.
शनिवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला होता. या भाषणानंतर फडणवीस यांनी "अरे छट हा तर निघाला… आणखी एक 'टोमणे बॉम्ब'… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा…" असे ट्वीट करत आज शिवसेनेला उत्तर मिळेल, असे स्पष्ट केले हाेते.
यावेळी फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेतील पदाधिकारी यशवंत जाधव यांची संपत्ती ३५ वरुन ५८ कोटीवरु कशी पोहचली. दाउदचे मित्र आजही मंत्रीमंडळात आहेत. मुंबई आणि राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री ठाकरे बोललेच नाही. शिवाजी महाराज यांचे नाव घेतलेल्यांनी सत्तेसाठी तलवारी म्यान केल्या असतील. मात्र आम्ही मुकाबला करु, असे आव्हानही त्यांनी दिले. मुंबईकरांना मराठी समजते. मात्र एक मुंबईकर मुंबईत कहर करतोय, अशी बाेचरी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
१९९२ साली मी बाबरी मशीद पाडायला गेलो होता, याचा मला अभिमान आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझं वजन १२८ किलो होतं. गरज पडेल तर पुन्हा कारसेवा करु. कारसेवकांची थट्टा करणार्यांना मी उत्तर देणार आहे. फोटाेग्राफी करुन वाघ होता येत नाही. तुम्ही कोणत्या आंदोलनात होतात. कोणता संघर्ष केला. दोन वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला तेव्हा मैदानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ फेसबुक लाईव्ह होते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
बाळासाहेब ठाकरे भोळे होते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते खरच आहे कारण वाघ हा भोळाच असतो. तुम्ही कोणते प्राणी आहात, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे वाघ होतेच. मात्र आता देशात केवळ एकच वाघ आहे ते आहेत नरेंद मोदी. दहशतवाद्यांना सीमेपार जावून कंठस्नान घालणारा हिंदू नरेंद्र मोदी आहेत. तुम्ही प्रश्न विचारायचा आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मारले जातात, असेही ते म्हणाले.
तुम्ही आमची संपत्ती घेवून दुसर्याची लग्न केले. किमान घटस्फोट तरी घेयचा हाेते, असा टोलाही त्यांनी केला. शिवसेनेकडे बाेलायला काेणताच मुद्दा नाही. त्यामुळे नेहमी पाठ केल्यासारखं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र रचले जातय, असे वाक्य शिवसेनेचे नेते म्हणतात. कुणाच्या बापाची हिंमत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची, असा सवालही त्यांनी केला. मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वासही फडणवीस यांनी त्यावेळी व्यक्त केले.
अडीच वर्षांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदाही राज्य आणि राज्यातील जनतेवर भाषणच केले नाही. कालचे उद्धव ठाकरे यांचे भाषण हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना समर्पित होते. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही स्वत:ला मुंबईचा बाप समजता. या राज्याचा आणि देशाचा एकच बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज, असेही फडणवीस यांनी ठणकावले.
हेही वाचा :