Latest

निमित्त बहुचर्चित ‘भेटी’ चे, चर्चा राजकीय ‘मैत्री’तील ‘घडलं-बिघडल्‍या’ची !

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांची आज (दि. ७) राजधानी दिल्‍लीत डिनर निमित्त भेट होत आहे. बिहारमध्‍ये पुन्‍हा एकदा भाजपशी हातमिळवणी केल्‍यानंतर नितीश कुमार पहिल्‍यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. विशेष म्‍हणजे बिहारमधील सरकारवरील विश्‍वास दर्शक ठरावापूर्वी ही भेट बहुचर्चित ठरली आहे. कारण या दोन्‍ही दिग्‍गज नेत्‍यांच्‍या मैत्रीचे नाते नेहमीच चढ-उताराचे राहिले आहे. त्‍यामुळे दोघांमधील लंच आणि डिनर हे चर्चेचा विषय ठरते. ( Bihar CM Nitish Kumar to meet PM Modi in Delhi ) जाणून घेवूया दोन दिग्‍गज नेत्‍यांमधील राजकीय मैत्रीतील चढ-उतार…

नितीश कुमारांनी मोदींना म्‍हटलं होते 'राष्‍ट्रीय नेता'

डिसेंबर 2003 मध्ये कच्छच्या आदिपूरमध्ये एका रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करताना, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणून नितीश यांनी नरेंद्र मोदी यांच्‍या कार्याचे कौतुक केले होते. 'संभाव्य राष्ट्रीय नेता' आणि 'विकासाचे राजकारणी' असा उल्‍लेख त्‍यांनी केला होता. नरेंद्र मोदी जास्त काळ गुजरातपुरते मर्यादित राहणार नाहीत आणि त्यांची सेवा देशाला मिळेल, अशी मला आशा आहे, असेही भाकित नितीश कुमारांनी केले होते. ( Bihar CM Nitish Kumar to meet PM Modi in Delhi )

२०१० : एक डिनर जे कधी झालंच नाही…

वर्ष होते २०१०. त्‍यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्‍यमंत्री होते तर नितीश कुमारांकडे बिहारचे नेतृत्त्‍व होते. जून २०१० मध्‍ये बिहारमध्‍ये भाजप राष्‍ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्‍यात आली. यानिमित्त मोदी हे बिहारमध्‍ये गेले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपचे जवळचे मित्र होते. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना डिनरचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका स्थानिक वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पानाची जाहिरात दिली होती. यामध्ये बिहारला पूरग्रस्त मदतीसाठी नितीश कुमार यांनी गुजरातचे आभार मानल्याचा उल्लेख होता.नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार एकत्र हात वर केल्‍याचा फोटोही होता. 2009 मध्ये लुधियाना येथे झालेल्या रॅलीचा हा फोटो होता. नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी ५ कोटी रुपयांचा धनादेश पाठवला होता. या जाहिरातीमुळे नितीश नाराज झाले. त्यांनी ही जाहिरात बिहारच्या जनतेचा अपमान म्हणून घेतली. या घडामोडीमुळे नितीश कुमारांचा राग अनावर झाला. त्यांनी भाजप नेतृत्वाला दिलेले निमंत्रण मागे घेतले. नरेंद्र मोदींनी त्या डिनरला हजेरी लावावी, असे नितीश यांना वाटत नव्हते. यावर नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांच्यावर 'अस्पृश्य असल्यासारखे वागले' आणि डिनरचे निमंत्रण मागे घेतले अशी टीका केली. ( Bihar CM Nitish Kumar to meet PM Modi in Delhi )

सात वर्षानंतर नितीश कुमारांचे पंतप्रधानांसोबत लंच

नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. दुसरीकडे, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांनी संसदेच्या ग्रंथालयात विरोधी पक्षांसाठी डिनरचे आयोजन केले होते. यासाठी नितीशकुमार यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. सोनियांच्या डिनरला गैरहजर राहत नितीश कुमार यांनी पंतप्रधानांसोबतच्या जेवणाला हजेरी लावली. अशा स्थितीत 7 वर्षांनंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुपारच्या जेवणावरून जवळीक वाढल्याची चर्चा होती. यावर संपूर्ण विरोधक नितीशकुमार यांच्यावर नाराज झाले होते. नितीश यांनी विरोधकांच्या बैठकीत शरद यादव यांना आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. यावरून राजद नेते रघुवंश प्रसाद यांनीही नितीश कुमारांवर टीका केली होती.

2013 मध्‍ये मैत्रीत बिघाड

नितीश कुमार यांचीही पंतप्रधान होण्‍याची महत्त्‍वाकांक्षा होती. मात्र २०१३ मध्‍ये गुजरातचे तत्‍कालीन मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव राष्‍ट्रीय राजकारणात घेतले जावू लागले. मोदी हे नितीश कुमारांचे प्रतिस्पर्धी झाले. जून २०१३ मध्‍येच नितीश कुमार यांनी भाजपसोबतचे १७ वर्षांपूर्वीची मैत्री तोडली. मोदींवर बोचरी टीका करत सर्व मंत्र्यांना त्यांच्या सरकारमधून काढून टाकले. डावे पक्ष, अपक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याने त्यांनी अल्पमतातील सरकार चालवले. भाजपने 9 जून २०१४ लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी हाच चेहरा असतील, असे स्‍पष्‍ट केले. यानंतर दोन्‍ही नेत्‍यांमधील बिघडलेल्‍या मैत्रीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

२०१७ मध्‍ये नितीश पुन्‍हा म्‍हणाले 'हम साथ साथ है…!'

बिहारमधील 2015 विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेससोबत निवडणूकपूर्व महाआघाडी केली. या निवडणुकीत महाआघाडी विजयी झाली. बिहारमध्‍ये लालूप्रसाद यादव यांचा राष्‍ट्रीय जनता दल हा पक्षा सर्वात मोठा पक्ष म्‍हणून विधानसभेत आला. तरीही नितीश कुमारच मुख्यमंत्री राहिले. मात्र, काही दिवसांनंतर राष्‍ट्रीय जनता दलाने मुख्‍यमंत्रीपदावर दावा सांगत दबावतंत्र सुरु केले. अखेर नितीश कुमारांनी जुलै २०१७ मध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून राष्‍ट्रीय जनता दलासोबतची युती मागे घेतली. त्‍यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी केली होती.

जी-२० परिषदेत पुन्‍हा नरेंद्र मोदी-नितीश कुमारांच्‍या 'लंच'ची चर्चा

मागील वर्षी दिल्लीत झालेल्या G-20 बैठकीत नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील केमिस्ट्री पुन्हा एकदा समोर आली. दोन्ही नेते राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या मेजवानीत एकत्र दिसले. आपण स्वतंत्र विचारसरणीचा माणूस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हजेरी लावली होती. मात्र यानंतर नितीश कुमार यांनी भाजप विरोधात राष्‍ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीसाठी पुढाकार घेतला. यासाठी पाटणात सर्व विरोधी पक्षांची बैठकही घेतली. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागांबाबत एकमत झालेले दिसत नाही. तसेच इंडिया आघाडीत नितीश कुमारांना संयोजकपद देण्याबाबत एकमत झाले नाही. यानंतर 28 जानेवारी २०२४ रोजी नितीश कुमारांनी पुन्‍हा यु-टर्न घेत भाजपबरोबर मैत्री केली. आज आता नितीश कुमार तब्‍बल सात वर्षानंतर नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यानिमित्त या दोन दिग्‍गज नेत्‍यांमधील राजकीय मैत्रीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा :

,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT