Latest

राहुल गांधींना मोठा दिलासा, मानहानी प्रकरणी पाटणा उच्‍च न्‍यायालयाने दिला ‘हा’ आदेश

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांना पाटणा उच्‍च न्‍यायालयाने आज ( दि. २४ ) मोठा दिलासा दिला. मानहानी प्रकरणी २५ एप्रिल रोजी न्‍यायालयात हजर राहण्‍याच्‍या आदेशाला उच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती दिली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १५ मे रोजी होणार आहे.

मोदी आडनावासंदर्भात केलेल्‍या आक्षेपार्ह विधानावरुन २०१९ मध्ये बिहारमधील भाजप नेते सुशील मोदी यांनी राहुल यांच्‍याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप त्‍यांनी केला होता. या प्रकरणी राहुल गांधींना २५ एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने हजर राहण्याचा आदेश रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका राहुल गांधींच्या वतीने पाटणा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. राहुल गांधी यांचे वकील अंशुल यांनीही या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

सोमवारी या प्रकरणावर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणी २५ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी न्‍यायालयात हजर राहण्‍याच्‍या आदेशाला स्‍थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवली आहे.

मानहानी प्रकरणी सूरत न्‍यायालयाने राहुल गांधींना ठरवले होते दोषी

मोदी आडनावावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर गुजरात भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी सुरतमध्ये राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी २३ मार्च २०२३ रोजी गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.तसेच १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा खासदारत्व रद्द करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT