Latest

Bengaluru Rains : ५०० वर्षे जुने बंगळूर शहर वारंवार का जात आहे पाण्याखाली ? जाणून घ्या ८ कारणं

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : एैतिहासिक बंगळूर सिटी कर्नाटक सारख्या समृद्ध राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय या शहराला ५०० हून अधिक काळाचा एतिहास आहे. एैतिहासिक काळापासून या शहराने नेहमी मोठे आणि समृद्ध शहर म्हणून रुबाब मिरवला आहे. सध्यासुद्धा ती आयटी हब म्हणून देशासह जगात प्रसिद्ध आहे. पण आता हिच समृद्धी आणि विकास तिच्या मुळावर उठला आहे. कारण, वारंवार होणाऱ्या पावसाने या शहराची मुंबई प्रमाणे तुंबई होत आहे. सतत होणाऱ्या पावसाने हे शहर पाण्यात बुडत आहे. जागो जागी पाणी साचत आहे. रस्त्यांना नाल्याचे स्वरुप येत आहे. यामुळे नारिकांची दैना उडत आहे. समृद्ध शहरातील नागरिकांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत. (Bengaluru Rains)

पुन्हा एकदा बुधवारी (दि.१९) बंगळूर शहराला मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले. ठिकाणी पाणी साचून राहिले. तर रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप येत यातून दुचाकी वाहने वाहत जाताना पाहण्यास मिळाली. शहराच्या उत्तरेकडील राजामहल गुट्टाहल्ली येथे झालेल्या ५९ मीमी पावसाने पार नागरिकांची दैना उडाली. पुढील तीन दिवस बंगळूरु शहरात असाच मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे. मागील महिन्यात अशाच पावसाने शहराला पाण्याखाली लोटले होते. आता पुन्हा तीच स्थिती बंगळूर शहरावर पुन्हा ओढावली आहे. वारंवार बंगळूर सोबत असं का घडतयं? इतक्या सुमृद्ध आणि विकासपूर्ण शहराचा हा बोजवारा का उडतोय? टेक सिटीचा रुबाब मिरवणारे शहर अव्यवस्था आणि आधुनिक शहरीकरणाच्या विकासाचा बळी ठरतोय का? असे एक ना अनेक प्रश्न बंगळूर शहरातील नागरिकांसह अवघ्या देशाला पडत आहेत. (Bengaluru Rains)

१. बंगळूर शहरातील जुनी आणि खराब ड्रेनेज व्यवस्था (Bengaluru Rains)

बंगळूर मधील या परिस्थितीची अनेक कारणे आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरातील पाणी वाहून जाण्यासाठी बनवलेले नाले जुने आणि खराब झाले आहेत. कदाचित त्यामुळेच अतिवृष्टीमुळे शहरातील ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हे नाले थोड्या प्रमाणात पडणाऱ्या पावसासाठी पुरेल अशी आहेत. मुसळधार पावसात या नाल्यांचा टिकाव लागत नाही व पाणी रस्त्यावर पडून वाहू लागले. वेळोवेळी नाले सफाई न केल्याने पावसाचे पाणी अडकून पडते त्यामुळे परिस्थिती बिकट होते.

२. कचऱ्यामुळे तुंबतात नाले

बंगळूरचे ड्रेनेज इन्फ्रास्ट्रक्चर अनपेक्षितपणे मुसळधार पावसाचा दबाव हाताळण्यासाठी अयशस्वी ठरत आहेत. कचऱ्यामुळे अनेकदा नाले तुंबतात, त्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह मर्यादित होतो व हे पाणी रस्त्यावर येते. (Bengaluru Rains)

३. शहराचे विस्तारीकरण आणि पायाभूत सुविधांचा अभाव 

शहराचा विकास व हद्दवाढ करण्यासाठी २००५ मध्ये आजुबाजूची ११० गावे बेंगळूर महानगर पालिकेशी (BBMP) जोडली गेली. परंतु महानगरपालिकेने गावांना शहरातील सांडपाणी पायाभूत सुविधांशी जोडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शहरातील रिंग रोडमुळे अनेक भागात पाणी साचते. कॉक्रीटच्या रस्त्यावरील पाणी आणि ड्रेनजमधील पाणी एकत्र होऊन ते रस्त्यावरुन वाहत व खोलगट भागात जाऊन साचते. त्यामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरुप येऊन अनेक ठिकाणी तलाव सदृष्य परिस्थीती निर्माण होते.

४ . नाल्यांची कमी झालेली संख्या 

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या अहवालानुसार 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला वृषभवती या भागात 226 किलोमीटचे सांडपाणी नाले होते. 2017 पर्यंत केवळ 110 किमीपेक्षा अधिक लांबीचेच नाले आता शिल्लक उरले आहेत. कोरमंगला भागाची गोष्ट सुद्धा अशीच आहे, तिचेसुद्धा घाण पाण्याचे नालेही निम्म्यावर आले आहेत. (Bengaluru Rains)

५ . नाल्यांची न केली जाणारी देखभाल

नाल्यांची मोठी समस्या म्हणजे न होणारी देखभाल. कॅगच्या अहवालात असे दिसून आले आहे की महापालिका 2019-20 पासून नाल्यांच्या देखभालीसाठी वार्षिक देखभाल कंत्राटे देत आहे, परंतु शहरातील एकूण नाल्यांपैकी केवळ 45 टक्के नाल्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्यामध्ये 842 किलोमीटरपैकी 377 किलोमीटर नाल्यांचाच समावेश होतो. बेंगळूरच्या आसपासच्या भागात अशीच वाईट परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी नाल्यांच्या सफाईसाठी ५० टक्क्यांहून कमी कंत्राटे दिली गेली आहेत.

६. वाढणारे शहरे व लोकसंख्या

औद्योगिक विकासामुळे शहरात अनेक मोठे उद्योग आहेत तसेच नवनवे उद्योग येत आहेत. यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. विविध उद्योग, कार्यालये आणि रोजगारामुळे शहराकडे येणारा लोंढा वाढतो आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. मात्र या साऱ्यांना सामावून घेणारी यंत्रणा अपुरी पडत आहे.

७. शहरावर काँक्रीटच्या जंगलाचे राज्य

सन 2017 पर्यंत, बेंगळूर शहराच्या 78 टक्के क्षेत्र काँक्रीटचे जंगल होते. परंतु 2020 पर्यंत शहरातील 90 टक्क्यांहून अधिक भागात नवीन इमारती बांधण्यात आल्या. यामध्ये ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 1973 पर्यंत बेंगळूरचे 68 टक्के क्षेत्र वनक्षेत्र होते. परंतु 2020 पर्यंत शहरातील केवळ 3 टक्केच हिरवळ उरली होती. याचाच अर्थ बंगळुरू शहरातील ड्रेनेजचे जाळे इतके खराब झाले आहे की, दोन दिवसांचा पाऊसही ते सहन करू शकलेले नाही.

८. केवळ बंगळूरच नाही तर प्रत्येक शहराची आहे हीच गोष्ट

आता पावसामुळे बंगळूरमध्ये सर्वत्र पाणी साचले असेल, तर त्यामागे सरकारी यंत्रणेचा दोष आहे. शहरात लोकांची संख्या वाढत गेली, कामावर येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. मात्र ड्रेनेजचे जाळे वाढण्याऐवजी कमी झाले. ती सुधारण्यासाठी कधीच गांभीर्याने प्रयत्न झाले नाहीत. ही स्थिती केवळ बंगळूरमध्येच नाही, तर देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये पाहायला मिळते. राजधानी दिल्लीतही पावसाळ्यात हीच परिस्थिती असते. या समस्येवर गंभीरपणे काहीही केले जात नाही. शहरांतील मलनि:सारण जाळ्याबाबत ठोस प्रयत्न होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची अडचण होते. देशाच्या सर्वच शहरातील लोक याच समस्येशी संघर्ष करत आहेत.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT