Latest

राधानगरी तालुक्यात बेंदूर सण उत्साहात साजरा (पहा व्हिडीओ )

अमृता चौगुले

कौलव; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्याच्या विविध गावात बेंदूर सण वाजत गाजत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कौलव येथे हत्ती, घोडे, उंट यांच्या लवाजम्यासह हजारो लोकांच्या साक्षीने पार पडलेला कर तोडण्याचा कार्यक्रम तालुक्यात लक्षवेधी ठरला.

ग्रामीण कृषी संस्कृतीत बेंदूर सणाला मोठे महत्त्व आहे. आजच्या ग्लोबल युगातही बेंदूर सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. राधानगरी तालुक्याच्या पूर्व भागासह भोगावती परिसरात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. तर पश्चिम भागात देशी बेंदूर साजरा केला जातो. आज बेंदरानिमित्त भल्या पहाटे बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालून त्यांची शिंगे रंगून अंगावर झुला चढवण्यात आल्या. त्यांची यथासांग पूजा करण्यात आल्यानंतर औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. बहुतांशी गावात कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. अनेक ठिकाणी बैलगाडी घोडागाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.

घरोघरी मातीच्या बैलाची प्रतिकृतीचे पूजन करून बेंदूर सण साजरा करण्यात आला. कौलव येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेला कर तोडण्याचा कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडला. या ठिकाणी पाटीलकीचा मान उद्योजक चंद्रकांत पाटील यांच्या घराण्याकडे होता. पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हत्ती, उंट व घोड्यांच्या लवाजम्यासह गुलालाच्या उधळणीत व वाद्यांच्या गजरात मानाच्या बैलाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. अमाप उत्साहात मानाच्या बैलाने कर तोडताच सर्वांनी एकच जल्लोष केला. अखंड तालुक्यात कर तोडण्याचा कार्यक्रम मोठा लक्षवेधी ठरला होता. कर तोडण्याच्या या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील विविध गावातून लोकांनी मोठी गर्दी केली होती.

SCROLL FOR NEXT