Latest

KL Rahul | केएल राहुलला धक्का, उपकर्णधारपदावरून हटवले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयने केएल राहुल (KL Rahul) याला टीम इंडिया कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून हटवले आहे. केएल राहुलच्या फलंदाजीतील त्याच्या खराब कामगिरीमुळे संघातील त्याच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने त्याला उपकर्णधारपदावरून हटवले आहे. पण राहुलला संघातून वगळण्यात आलेले नाही.

बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यासाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. पण खराब फॉर्ममधून जात असलेल्या राहुलच्या नावासमोरील उपकर्णधारपद काढून टाकण्यात आले आहे. केएल राहुलने जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने ११ डावांत केवळ १७५ धावा केल्या आहेत. राहुलची (KL Rahul) गेल्या सात डावांमधील धावसंख्या २२, २३, १०, २, २०, १७ आणि १ अशी आहे. शुभमन गिल सध्या फॉर्मात आहे. यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनावर तोडगा काढण्यासाठी दबाव वाढला आहे. एका रिपोर्टनुसार, बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला कसोटी सामन्यात उपकर्णधार नियुक्त करण्याचे अधिकार दिले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

दरम्यान, रवींद्र जडेजाच्या सप्तरंगी कामगिरीच्या जोरावर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सलग दुसर्‍या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला चितपट केले. रविवारी दिल्ली कसोटीच्या तिसर्‍या दिवशी रोहित आर्मीने कांगारूंना ६ गडी राखून मात देत चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. या विजयामुळे भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखीन सोपा झाला आहे. ४२ धावांत ७ विकेटस् घेणारा जडेजा सामन्याचा मानकरी ठरला. या विजयाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गतविजेत्या भारताकडेच राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT