पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नवीन घर घेतले आहे. असे मानले जात आहे की लवकरच ते त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होतील. गेल्या ४८ वर्षांपासून गांगुली हे त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यात वास्तव्य करत होते. आता त्यांनी नवीन घर घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की सौरव गांगुलीच्या नवीन घराची किंमत 40 कोटी रुपये आहे.
सौरव गांगुली प. बंगालमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहेत. ते त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रिन्स आणि कोलकाताचा दादा म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सुरुवातीपासूनच त्यांनी राजेशाही थाटात आयुष्य व्यतीत केले. मात्र, क्रिकेटच्या विश्वात गांगुलींनी आपले नाणे खणखणीत वाजवल्यानंतर त्यांच्या प्रसिद्धीला चार चाँद लागले.
सध्या, सौरव गांगुली त्यांच्या जुन्या वडिलोपार्जित वाड्यात आपल्या कुटुंबासह राहत आहेत, परंतु ते लवकरच हा वाडा सोडून आपल्या नवीन घरात राहायला जाणार असल्याचे समजते आहे. त्यांच्या नव्या घराची किंमत जवळपास 40 कोटी रुपये आहे.
सौरव गांगुली यांचा जन्म आणि पालनपोषण बिरेन रॉय रोडवर असलेल्या त्यांच्या वडिलोपार्जित वाड्यात झाले आणि त्यांनी आपल्या आयुष्यातील 48 वर्षे येथेचे व्यतीत केली. पण आता कोलकात्यातील सर्वात पॉश भागात एक आलिशान घर घेतल्यानंतर गांगुलींनी आपल्या वडिलोपार्जित वाड्याला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गांगुली यांचा वडिलोपार्जित वाडा हा सर्वात महागड्या वास्तूंपैकी एक असून त्याची किंमत कोटींच्या घरात आहे. आता आपली कीर्ती पुढे नेत त्यांनी लोअर रोडन स्ट्रीटवर दोन मजली आलिशान घर विकत घेतले आहे.
वृत्तानुसार, सौरव गांगुली यांची आई निरुपा गांगुली, पत्नी डोना, मुलगी सना स्वत: सौरभ गांगुली या नवीन आलिशान घराचे सह-मालक आहेत. त्यांनी ही मालमत्ता अनुपमा बागरी, केशव दास बिनानी आणि निकुंज बिनानी यांच्याकडून 40 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. बीसीसीआय अध्यक्षांना त्यांचे जुने घर सोडण्याबाबत विचारले असता ते थोडे भावूक झाले.
द टेलिग्राफशी बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, "माझ्याकदे आता माझे स्वतःचे घर आहे याचा मला आनंद आहे. मला वाटतं हेच घर मला हवं होतं. मला विश्वास आहे की शहराच्या मध्यभागी राहणे आरामदायक आणि सोयीस्कर असेल, परंतु सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मी 48 वर्षांपासून राहत असलेला वाडा सोडणे.'
सौरव गांगुली त्याच्या कुटुंबासह त्याच्या नवीन घरी कधी शिफ्ट होतील याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच सौरव गांगुली सध्या आयपीएल 2022 आणि आगामी दक्षिण आफ्रिका मालिकेच्या तयारीत व्यस्त आहेत.