Latest

हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ गडहिंग्लज बंद, कार्यकर्ते आक्रमक

निलेश पोतदार

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री आ. हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज (बुधवार) ईडीचे छापे पडले. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज शहरासह कडगाव-कौलगे मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेससह आ. मुश्रीफ समर्थकांनी आक्रमक होत निषेध नोंदविला आहे. गडहिंग्लज शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बंदची हाक दिली. कार्यकत्यांच्या आवाहनानुसार आज (बुधवार) गडहिंग्लजची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आ. मुश्रीफांवरील कारवाईचा निषेध नोंदवित भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

कागल मतदार संघाचे आमदार हसन मुश्रीफ आणि कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरावर सकाळी सक्तवसुली संचालनालयाने छापा टाकला. याबाबतचे वृत्त समजताच कागल मतदार संघातील गडहिंग्लज शहर तसेच कडगाव-कौलगे मतदार संघातील कार्यकर्ते शहरात एकत्र आले. त्यांनी संपूर्ण शहरात फिरुन आ. मुश्रीफांवरील कारवाईच्या निषेधार्थ व्यापार बंद ठेवण्याचे आवाहन केले. यानुसार शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी, आ. मुश्रीफ हे गोरगरिबांचे कैवारी आहेत. तळागाळातील जनतेची सेवा करण्यात त्यांनी आजवर हयात घालविली आहे. मुश्रीफांचा वाढता जनाधार सहन न झाल्यानेच भाजपने राजकीय द्वेषातून ही कारवाई केली असून, याचा निषेध करत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान दिवसभर कार्यकर्ते शहरातून फिरुन बंदचे आवाहन करताना दिसत होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, वसंत यमगेकर, उदय जोशी, अमर मांगले, युवक शहराध्यक्ष गुंडू पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष महेश सलवादे, रमजान अत्तार, हारुण सय्यद, दीपक कुराडे, राहुल शिरकोळे, अशोक खोत, गिजवणेचे ग्रा. पं. सदस्य आदित्य पाटील, हिरलगे सरपंच सचिन देसाई, माजी नगरसेविका रेश्मा कांबळे, शर्मिली पोतदार, अरुणा कोलते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT