Latest

Balasaheb Thackeray Smrutidin:”मातोश्रीच्‍या गोटातले घरभेदी”, नारायण राणेंनी शेअर केली बाळासाहेब ठाकरेंची आठवण

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा (Balasaheb Thackeray Smrutidin) स्मृतिदिन. २३ जानेवारी १९२६ रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. स्मृतिदिनानिमित्त भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की," साहेबांवर माझं प्रेम आणि निष्‍ठा होती, ती अशी. शेवटी ते माझे गुरु होते, पितृतुल्‍य होते".

वाचा सविस्तर पोस्ट नारायण राणे यांच्याच शब्दांत….

Balasaheb Thackeray Smrutidin : पवारांनी उद्धवजींना सावध केलं…

शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत खास आठवण आपल्या 'X' अकाऊंटवर शेअर केली आहे. ही आठवण त्यांनी आपल्या ''झंझावात'' या आत्‍मचरित्रात लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,

"असे प्रेम आणि विश्‍वास पुन्‍हा मिळेल काय?

असे साहेब पुन्‍हा होणे नाही! साहेब या जगातून निघून गेल्‍याला आज 11 वर्षे पूर्ण झाली. साहेब नाहीत यावर आज सुद्धा विश्‍वास बसत नाही. ''झंझावात'' या माझ्या आत्‍मचरित्रातील साहेबांची एक आठवण आजच्‍या दिवशी सगळ्यांनी वाचावी ही नम्र विनंती. …..पवारांनी उध्‍दवजींना सावध केलं की, मातोश्रीवर बॉम्‍बहल्‍ला करण्‍याचा कट शिजल्‍याची पक्‍की खबर येत असून त्‍यासाठी अतिरेकी मुंबईत पोहोचलेदेखील आहेत! पण, पवारांच्‍या काळजीचं कारण वेगळंच होतं. त्‍यांच्‍या मते, या कटात चक्‍क काही घरभेदी सामील होते! साक्षात मातोश्रीच्‍या आतल्‍या गोटातले घरभेदी! त्‍यांना साथ होती राज्‍याच्‍या पोलीस दलातल्‍या आणि गृहमंत्रालयातल्‍या सूर्याजी पिसाळाच्‍या अवलादींची!!

पवारांनी सांगितलं की, हा हल्‍ला परवाच्‍या दिवशी होणार आहे. त्‍यांनी उध्‍दवजी यांना पोलीस बंदोबस्‍त वाढवण्‍याबद्दल विचारणा केली आणि त्‍यांना सावधगिरीचा सल्‍ला दिला की, ही बातमी ठाकरे कुटुंबाव्‍यतिरिक्‍त बाहेर कळता कामा नये. या बातमीनं सुन्‍न झालेल्‍या उध्‍दवजी यांनी तातडीने यावर साहेबांशी बराच वेळ चर्चा केली. बाळासाहेबांनी घरातल्‍या प्रत्‍येक सदस्‍याला सुरक्षित ठिकाणी निघून जाण्‍याचा आणि काही दिवस 'मातोश्री' पासून दूर राहण्‍याचा आदेश दिला. त्‍यांनी सर्वांना असा सल्ला दिला की, कुणालाही एकमेकांच्‍या या ठावठिकाण्‍याबद्दल कसलीच कल्‍पना असता कामा नये. मग, दुस-याच दिवशी साहेब आपली पत्‍नी श्रीमती मीनाताई आणि त्‍यांचा विश्‍वासू सेवक थापा यांच्‍यासमवेत त्‍यांच्‍या मित्‍सुबिशी पजेरो गाडीने लोणावळयाकडे निघाले.

बाळासाहेबांसाठी त्‍या काळात एकच सुरक्षित ठिकाण होतं आणि ते म्‍हणजे लोणावळा. लोणावळयाला निघण्‍यापूर्वी साहेबांनी मला मातोश्रीवर बोलाविले. त्‍यांनी मला विचारले, काय करतोस? कुठे जाणार आहेस काय? उद्या सकाळी तू तुझा फौजफाटा घेऊन मातोश्रीवर ये. कुठे जायचे ते मी सकाळी सांगेन. माझ्या गाडीमागे यायचं काहीही विचारायचं नाही. मी म्‍हणालो, ठीक आहे साहेब. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मातोश्रीवर पोहोचलो. मी येताच साहेबांची गाडी कलानगरातून बाहेर पडली. तिथून ती सरळ लोणावळ्याला एका बंगल्‍याजवळ जाऊन थांबली. त्‍या बंगल्‍याच्‍या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्‍त लागलेला होता.साहेब त्‍या बंगल्‍यात थांबले. त्‍या बंगल्‍याच्‍या समोरच्‍या बंगल्‍यात आम्‍हा शिवसैनिकांची आणि पोलिसांची राहण्‍याची व्‍यवस्‍था होती. रात्री साहेबांनी मला बोलावून घेतले आणि विचारले की, व्‍यवस्‍था चांगली झाली आहे काय? मी 'होय' असे सांगितले. तो डिसेंबरचा उत्‍तरार्ध असल्‍यामुळे थंडी मोठया प्रमाणावर होती. रात्री २ वाजताच्‍या सुमारास मॉंसाहेब गॅलरीत आल्‍या.

त्‍यांनी पाहिलं की, आम्‍ही चार जण एका गाडीमध्‍ये बंगल्‍याच्‍या समोरच बसलो आहोत आणि गाडीच्‍या बाहेर शेकोटी पेटविलेली आहे. त्‍यांनी वरुनच विचारले, 'काय राणे, झोप येत नाही काय?' मी म्‍हणालो, 'नाही. मॉंसाहेब, आम्‍ही जागतो आहोत.' त्‍यानंतर, त्‍यांनी चहा वगैरे काही पाहिजे का, अशी विचारणा केली. मी 'नाही' म्‍हणालो, तेवढ्यात, साहेब पण बाहेर गॅलरीत आले. त्‍यांनी आमची विचारपूस केली आणि जेवण झाले काय, याचीही चौकशी केली. त्‍यानंतर मॉंसाहेब आणि साहेबसुध्‍दा आत गेले. मारेकऱ्यांनी आमचा माग काढला असेल किंवा नसेल. पण, मला नशिबावर हवाला ठेवून चालणार नव्‍हतं. या सुरक्षारक्षकांचा काय भरवसा, कोण कधी फिरेल, काही सांगता येतं? धोका फार मोठा होता. साहेबांच्‍या सुरक्षिततेसाठी आम्‍हा शिवसैनिकांना संपूर्ण रात्र डोळ्यांत तेल घालून उभं राहावं लागणार होतं. साहेबांवर माझं प्रेम आणि निष्‍ठा होती, ती अशी. शेवटी ते माझे गुरु होते, पितृतुल्‍य होते… साहेबांना मनापासून श्रध्‍दांजली !"

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT