Latest

सांगली : स्वातंत्र्यसेनानी बाबू हसन नदाफ यांचे निधन

अनुराधा कोरवी

तासगाव : पुढारी वृत्तसेवा; मणेराजूरी (ता. तासगाव) येथील स्वातंत्र्यसेनानी बाबू हसन नदाफ ( वय १०३ ) यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी (१५) रोजी सकाळी त्याची प्राणज्योत मावळली. मणेराजूरीतील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले त्यातीलच अखेरचे नाव म्हणजे बाबू नदाफ.

महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशातील जनतेला 'करा किंवा मरा' हा निर्वाणीचा मंत्र दिला. तर इंग्रजांना 'छोड़ो भारत' शेवटचा आदेश दिला. त्यावेळी देशातील सर्व जाती धर्माची जनता रस्त्यावर उतरली. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, बर्डे गुरुजी यांचेसोबत सांगली जिल्ह्यात क्रांतिकारकांची फौज उभी राहिली. त्या तुफान सेनेतील एक क्रांतिकारक म्हणजे बाबू हसन नदाफ.

मणेराजुरी गावातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील जन्माला आलेले बाबू नदाफ हे गांधीजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. भूमिगत होऊन तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वे रूळ उखडणे, रेल्वे लुटणे अशा धाडसी पणाने इंग्रजांच्या विरोधातील सशस्त्र चळवळीत मोठा सहभाग घेतला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर अटक वॉरंट काढले. पण ते सापडत नाहीत म्हटल्यावर पकडून किंवा पत्ता सांगणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते.

शेणोली येथे रेल्वेची लुट सुरू असताना गोळीबार झाला. त्यावेळी पोलिसांना चकवा देऊन पळताना बाबू नदाफ आणि त्यांचे सहकारी बापू शेवाळे हे दोघे जखमी झाले. बाबू नदाफ यांना पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत पोलिसांनी त्यांना अटक केली. कोल्हापूरला जेलमध्ये नेत असताना वॉन्टेड क्रांतिकारक जिवंत पकडला म्हणून बक्षिसांची रक्कम पोलिसांनी त्यांच्या अंगावर उधळून आनंद साजरा केला होता. त्यांना तीन वर्षांनी शिक्षा झाली असता त्यांना पुणे येथील येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले होते. शिक्षा भोगून बाहेर आलेनंतर ते पुन्हा चळवळीत सक्रिय झाले.

महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेचे कॅप्टन शाहनवाज खान यांची भेट घेतली व सहभाग घेतला होता. १९८८ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना ताम्रपट देऊन त्यांचा दिल्लीत सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने ही त्यांचा सन्मान केला होता. २०२२ चालू वर्षात सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस या नवीन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन व कोरोनाकाळातील तासगाव येथील कोरोना हॉस्पीटलचा शुभारंभ ही तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बाबू नदाफ यांचे हस्ते करण्यात आला होता.

स्वातंत्र्याच्या ७५ अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी शासनाच्या वतीने तहसीलदार रविंद्र रांजणे यांनी त्यांचा मणेराजूरी येथे सत्कार केला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची गुरुवारी प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर मुस्लीम धर्म शास्त्राप्रमाणे दफनभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT