Latest

धुळ्यात वाईन शॉप हटवण्यावरून आझाद समाज पार्टीचे आंदोलन चिघळले

गणेश सोनवणे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरातील शहर पोलीस ठाणे नजीक असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेले मद्य विक्रीचे दुकान हटवण्याच्या मागणीसाठी आज आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन चिघळले आहे. कार्यकर्त्यांनी शटर बंद असलेल्या या दुकानाचा फलक फोडला. त्यामुळे पोलीस पथकाने पाच जणांना ताब्यात घेतले असून भीम सैनिकांनी आंदोलन सुरू केले. दरम्यान या संदर्भात 23 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी स्तरावर बैठक होऊन निर्णय होणार असल्याची माहिती उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली आहे.

धुळ्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या विनोद वाईन शॉप हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. मात्र हे दुकान याच ठिकाणी सुरू आहे. या संदर्भात आता आझाद समाज पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. या संदर्भात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे तसेच रिपाईचे मुकुंदराव शिरसाठ, आबा अमृतसागर, भैय्या वाघ आदींच्या नेतृत्वाखाली साक्री रोड वरून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पुतळ्या नजीक पोहोचला. यावेळी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शटर बंद असलेल्या विनोद वाईनचा फलक फोडला. त्यामुळे बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस पथकाने आनंद लोंढे यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे आझाद समाज पार्टीच्या वतीने पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील गर्दीला पांगवण्याचे आवाहन केले. त्यामुळे थोडी पळापळ देखील झाली. दरम्यान आंदोलकांनी वाईन शॉप हटवण्याची मागणी लावून धरल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण देखील झाले.

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत असताना उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी सांगितले की, आझाद समाज पार्टीच्या वतीने मद्य विक्री दुकान हटवण्याची मागणी झाल्यानंतर त्यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांना शांततेत आंदोलन करण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाच्या वतीने सहमती दर्शवली होती. मात्र अशा पद्धतीने तोडफोड करणे योग्य नाही. सदर मद्य विक्रीचे दुकान हलवण्यासंदर्भात 23 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात कामकाज होणार आहे. यावेळी या दुकानाचे सर्व कागदपत्र तपासले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान येत्या पाच दिवसात हे वाईन शॉप हटवले गेले नाही तर 26 जानेवारी रोजी आझाद समाज पार्टीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या झेंडावंदन कार्यक्रमाला तीव्र विरोध करुन निषेध आंदोलन केले जाईल. त्याचप्रमाणे प्रसंगी सामूहिक आत्मदहन देखील केले जाईल असा इशारा आझाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT