पुढारी ऑनलाईन डेस्क: अयोध्येतील 'राम मंदिर उद्घाटन' प्रसंगी भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. उद्धाटनापासून पहिल्या १०० दिवस देशाच्या विविध भागातून १ हजारांहून अधिक रेल्वे आयोध्येला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे संचालन 'राम मंदिर उद्घाटन' सोहळ्याच्या काही दिवस आगोदर म्हणजे शुक्रवारी १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या संदर्भातील वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. (Ayodhya Ram Temple Inauguration)
अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मंगळवारी २३ जानेवारीपासून हे मंदिर लोकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या १ हजारांहून अधिक गाड्या देशभरातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळूर, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मू काश्मीर असा विविध प्रदेश आणि शहरांसह अयोध्येला जोडतील. तसेच प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल असे देखील भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. (Ayodhya Ram Temple Inauguration)
अयोध्येत मोठ्या संख्येने पायी येणा-जाणाऱ्यांची सोय करण्यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच दररोज सुमारे 50,000 लोकांची ये-जा हाताळण्याची क्षमता असलेले पुनर्विकसित स्टेशन १५ जानेवारीपर्यंत पूर्णपणे तयार होईल, असे एका सूत्राने सांगितले आहे. तर आतापर्यंत काही गाड्या यात्रेकरूंच्या गटाकडून अयोध्येसाठी चार्टर्ड सेवा म्हणूनही बुक केल्या जात आहेत, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. (Ayodhya Ram Temple Inauguration)