पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवात आपापल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध वस्तू अयोध्येला पाठवण्यात येत आहेत. पिलीभीतहून २१.६ फूट लांबीची बासरी अयोध्येला पाठवली जाणार आहे. तेथील संग्रहालयात ही बासरी ठेवण्यात येणार आहे. या बासरीचा व्यास ३.५ इंच असून ती बनवण्यासाठी १० दिवस लागले. या बासरीचे वैशिष्ट्ये म्हणजे दोन्ही बाजूंनी ती वाजवता येते.
पिलीभीत शहरातील प्रसिद्ध कारागीर दिवंगत नवाब अहमद यांच्या पत्नी हीना परवीन, त्यांचा मुलगा अरमान नबी आणि त्यांचे काका शमशाद यांच्यासह त्यांच्या मित्रांनी ही बासरी तयार केली आहे. शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ब्रज प्रांत प्रचारक हरीश रौतेला यांनी या बासरीचे पूजन केले. २६ जानेवारीला ही बासरी अयोध्या धामला रवाना होणार आहे. तिथे ती संग्रहालयात ठेवली जाईल.
अरमान याने सांगितले की, २०२१ मध्ये त्याने १६ फूट लांब बासरी बनवली होती. या बासरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही त्या काळातील सर्वात लांब बासरी होती. आता २१.६ फुटांची बासरी बनवण्यात आली आहे, जी जगातील सर्वात लांब बासरी असेल.
मुस्लिम कुटुंबाने बनवलेली ही बासरी वैशिष्ट्येपूर्ण आहे. बासरी बनवणे हे त्यांचे पिढीजात काम असल्याचे अरमानने सांगितले. पुढे त्याने सांगितले की, आसाममधील ज्या बांबूपासून ही बासरी बनवली आहे, तो सुमारे २० वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता. २०२१ मध्ये जेव्हा आम्ही सर्वात लांब बासरी बनवली होती, तेव्हा आम्ही ती वापरणार होतो, पण जेव्हा आम्हाला दुसरा बांबू मिळाला तेव्हा आम्ही तो परत ठेवला. असा विचार पण केला नव्हता की त्याचा उपयोग रामनगरीसाठी बासरी बनविण्याकरीता होईल.
हेही वाचा :