Ram Mandir Ayodhya : रामलल्ला विराजमान! मोहम्मद रमजान यांनी स्वत: साकारले बालस्वरूपाचे सिंहासन | पुढारी

Ram Mandir Ayodhya : रामलल्ला विराजमान! मोहम्मद रमजान यांनी स्वत: साकारले बालस्वरूपाचे सिंहासन

जयपूर : वृत्तसंस्था : मकराना हे राजस्थानातील शहर संगमरवरसाठी प्रसिद्ध आहे. आता ते मोहम्मद रमजान आणि गनी मोहम्मद यांचे शहर म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. रमजान शब्दाच्या स्पेलिंगमध्येही राम आहेत. राम मंदिराचा निकाल लागल्यानंतर मोबाईलच्या जमान्यात खूप दिवसांनी रमजान यांचा लँडलाईन फोन वाजला होता. रमजान यांना हे रामलल्लाचे दुसरे बोलावणे होते. संगमरवरकार मोहम्मद गनी यांच्यासह मोहम्मद रमजान अयोध्येला निघाले… बघता बघता मंदिर उभे केले. आता रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची घटिका जवळ येऊन ठेपली आहे.

25 वर्षांपूर्वीच राम मंदिराचे काम रमजान करतील, हे ठरलेले होते. राम मंदिराचे काम फक्तआणि फक्त रमजानच करेल, असे तेव्हा स्वत: रमजान हे विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांसमक्ष म्हणाले होते आणि 25 वर्षांनी घडलेही तसेच!

संगमरवराचे एकुणातील काम गनी मोहम्मद यांनी पाहिले; पण मार्गदर्शक म्हणूनही रमजान यांची भूमिका या रामकार्यात मोलाची ठरली. रामलल्लाचा विशेष लळा म्हणून रामलल्लाचे सिंहासन पूर्णपणे त्यांनी स्वत: तयार केले.

गर्भगृहाच्या भव्य भिंती, छत, दरवाजे, फरशी, पायर्‍या रमजान यांच्या कारागिरीने दिव्य बनल्या आहेत. सुमारे 25 वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेचे लोक रमजान यांचे वडील सेठ बहुद्दीन यांच्याकडे आले होते. बहुद्दीन आणि त्यांचे चिरंजीव मोहम्मद रमजान यांच्या संगमरवर कलेने ही मंडळी तेव्हा थक्क झाली होती. तेव्हा रमजान यांनी अयोध्या दौराही केला होता आणि रमजाननेच रामलल्लाचे काम करायचे असे ठरले होते. मंदिराचे, सिंहासनाचे डिझाईन गोपनीय राहायला हवे, हा करार मंदिर तीर्थ ट्रस्ट व मोहम्मद रमजान यांच्यात झाला होता. रमजान यांनी तो 25 वर्षे तंतोतंत पाळला. मंदिराची कोणतीही रचना किंवा नकाशा लीक होणार नाही, चोरीला जाणार नाही याची आम्ही डोळ्यात तेल घालून काळजी घेतली, असे मोहम्मद रमजान सांगतात.

मकराना संगमरवर

  • शून्य टक्के लोह, 95 टक्के कॅल्शियम
  • जुने होत नाही. वेळ पुढे सरकते तसे अधिक चकाकते.
  • राम मंदिराचे गर्भगृह याच संगमरवराने बनलेले आहे.
  • रमजान यांच्या 650 जणांच्या चमूने हे संगमरवर मिळविले.

दोघांना निमंत्रण

  • संगमरवरकार मोहम्मद गनी, संगमरवर कलावंत मोहम्मद रमजान यांना रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रणही मिळाले आहे.
  • अयोध्येत आलिशान हॉटेलमध्ये दोघांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

रामकार्यासाठी झालेली निवड रमजान यांनी सार्थ ठरविली.

– चंपत राय, सरचिटणीस, राम मंदिर तीर्थ ट्रस्ट, अयोध्या

Back to top button