वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर अधिकाऱ्यांकडून नाहक कारवाई करण्यात येत आहे. अधिकारी आंदोलकांवर गुन्हे दाखल करत आहेत. हा प्रकार गंभीर असून बीडमधील अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समज द्यावी, तेथील अधिकारी हे जातीयवादी आहेत. मात्र मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रकार थांबवला नाही, तर दोन दिवसांत बीडमधील मराठा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगे – पाटील यांनी दिला. Manoj Jarange-Patil
अकरा दिवसांच्या उपचारानंतर मनोज जरांगे- पाटील अंतरवाली सराटीत साखळी उपोषणाला बसले आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. Manoj Jarange-Patil
यावेळी ते म्हणाले की, बीड आणि जालन्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे २४ तारखेपर्यंत काहीही बोलता येणार नाही. बीडमधील राजकीय नेत्यांची घरे, कार्यालये यांची तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नसून त्यांच्याच राजकीय वादातून ही जाळपोळ झाली आहे. त्यामुळे मराठा समाजावर नाहक असे गुन्हे दाखल झालेले आम्ही खपवून घेणार नाही.
जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांवर टीका करू नये, या बबनराव तायवाडे यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. आमची लढाई न्यायासाठी आहे. ती सरकारच्या विरोधात आहे. ओबीसी नेत्यांनी आमच्या विरोधात बोलू नये. आम्हाला आरक्षण कसे द्यायचे, याबाबत ओबीसी नेत्यांनी ज्ञान पाजळू नये. तुमचे आमचे शत्रूत्व नाही, आम्हाला विरोध करू नका, असे जरांगे- पाटील म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना फोनवर आलेल्या धमकीबाबत जरांगे- पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, वडेट्टीवार यांच्या मनात मराठ्यांविषयी पाप आहे. मात्र, मराठ्यांनी वडेट्टीवार यांच्याबद्दल मनात पाप ठेऊ नये, धमकी देणारा कोण आहे, हे आम्हाला माहीत नाही. पण त्यांना धमकी दिल्याने वडेट्टीवार यांचे विचार बदलणार नाहीत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
हेही वाचा