पुढारी ऑनलाईन डेस्क : AUSvsSA brisbane test : स्टार्क, कमिन्स, बोलँड आणि लायन यांच्या भेदक मा-याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत कसोटी जिंकून 91 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती केली. रविवारी (18 डिसेंबर) ब्रिसबेन कसोटीत त्यांनी पाहुण्या द. आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली आणि ऐतिहासिक विजय नोंदवला. याचबरोबर ऑस्ट्रिलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
कांगारूंना दुसऱ्या डावात विजयासाठी 33 धावांची गरज होती. मात्र, या माफक आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजांची दमछाक झाली. अखेर 4 विकेट्स गमावून त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला. ब्रिस्बेन कसोटीत गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आणि दोन दिवसांतच 34 विकेट पडल्या. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दोन्ही दिवशी 15-19 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगरूंच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत द. आफ्रिकेचा पहिला डाव 152 धावांत गुंडाळला. काइल व्हेरेनने सर्वाधिक 64 धावा केल्या. स्टार्क (3 बळी), लायन (3), कमिन्स (2) आणि बोलँड (2) या वेगवान गोलंदाजांनी द. आफ्रिकेच्या डावाला सुरुंग लावला. प्रत्युत्तरात कांगारूंच्या फलंदाजांची भांबेरी उडाली. पाहुण्या संघाचे रबाडा (4 बळी), मार्को जेन्सन (3), नॉर्टजे (2), लुंगी एन्गिडी (1) यांनी टीच्चून मारा केला आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 218 धावांत रोखला. अशा प्रकारे यजमानांना पहिल्या डावात 66 धावांची आघाडी मिळाली. (AUSvsSA brisbane test)
दुस-या डावात द. आफ्रिका मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारेल अशी अपेक्षा होती. पण ते यावेळीही अपयशी ठरले. कांगारूंच्या गोलंदाजांपुढे त्यांचा टीकाव लागला नाही आणि त्यांचा दुस-या डावात 100 धावाही करता आल्या नाहीत. 37.4 षटकात द. आफ्रिकेचा 99 धावांवर ऑलआऊट झाला. त्यांचे केवळ 3 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. यात खाया जोंडोने नाबाद 36, टेंबा बावुमाने 29 आणि केशव महाराजने 16 धावा केल्या. तर 4 फलंदाजांचे खातेही न उघडता तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्सने 5, तर मिचेल स्टार आणि स्कॉट बोलँडने 2-2 विकेट घेतल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 34 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी 7.5 षटकात 4 गडी गमावून बाद 35 धावा करत सामना जिंकला. कांगारूंच्या चारही विकेट्स रबाडाने पटकावल्या. कागिसो रबाडाने उस्मान ख्वाजा (2), डेव्हिड वॉर्नर (3), स्टीव्ह स्मिथ (6), ट्रॅव्हिस हेड (0) यांची शिकार करत 4 षटकात फक्त 13 धावा दिल्या. (AUSvsSA brisbane test)
या सामन्यात केवळ दोन अर्धशतके झाली. आफ्रिकन संघासाठी व्हेरीनने पहिल्या डावात 64 आणि ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने पहिल्या डावात 92 धावा केल्या. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे.