पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग-डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिमाखदार विजय नोंदवला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. ( AUS vs SA Test )
मेलबर्न कसोटीत यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ८ गड्यांच्या मोबदल्यात ५७८ धावा केल्या
होत्या. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना एनरिक नोर्टेने 3 बळी घेतले. कागिसो रबाडाने दोन बळी मिळवले. तसेच लुंगी एनगिडी आणि मार्को जॉन्सन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियाच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १८९ धावांमध्ये आटोपला, तर दुसऱ्या डावात अवघ्या २०४ धावांमध्ये संपूर्ण संघ तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाने ही कसोटी एक डाव आणि १८२ धावांनी जिंकली. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात नॅथन लायनने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर स्कॉट बोलंडने 2 बळी घेतले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाने शानदार विजय नोंदवत कसोटीमध्ये आपलं अग्रस्थान कायम ठेवले होते.
मेलबर्न बॉक्सिंग-डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने तडाखेबाज व्दिशतक झळकावले. त्याने 255 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 200 धावांची खेळी केली. या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८ गडी गमावत ५७८ धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज लेक्स कॅरीने द. आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करून बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसर्या दिवशी शतक झळकावले. कांगारू संघासाठी बॉक्सिंग-डे कसोटीत शतक झळकावणारा तो इतिहासातील दुसरा विकेटकीपर फलंदाज ठरला. कॅरीने 15 व्या कसोटीत तीन आकडी धावसंख्या गाठली. त्याने कसोटी करिअरमधील पहिले शतक 133 चेंडूंत पूर्ण केले. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात कॅरी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. त्यावेळी संघाची धावसंख्या 400 होती. त्यानंतर त्याने चौफेर फटकेबाजी करून स्वत:चे पहिले शतक पूर्ण केलेच त्याचबरोबर त्याने संघाला मोठी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
गेल्या 9 वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा कॅरी हा पहिला ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ठरला आहे. याआधी 2013 साली ऑस्ट्रेलियाकडून यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनने (118) अॅशेस मालिकेतील अॅडलेड कसोटीत शतक पूर्ण केले होते. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी दिवंगत यष्टिरक्षक रॉडनी मार्श यांनी 1977 मध्ये अॅशेस मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीत शतकी (110) खेळी साकारली होती.
हेही वाचा :