Latest

पवन खेडा यांना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

मोहन कारंडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप काँग्रेसकडून आज (दि.२२) करण्यात आला आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथे जाण्यासाठी इंडिगोच्या विमानात बसले असता त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. तसेच त्यांना रायपूरला जाण्यापासून रोखण्यात आले, असा दावा काँग्रेसने केला आहे.

'रायपूरला काँग्रेसचे महाअधिवेशन होणार असून त्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी खेडा तिकडे चालले होते. हुकुमशहाने अधिवेशनाच्या आधी ईडीमार्फत छापे टाकले आणि अशा प्रकारचे कृत्य केले जात आहे', अशी टिप्पणी काँग्रेसने सोशल मीडीयाच्या माध्यमातून केली आहे. याबाबत खेरा म्हणाले की, "मला सांगण्यात आले की त्यांना माझे सामान बघायचे आहे. मी म्हणालो माझ्याकडे हँडबॅगशिवाय काही नाही. जेव्हा मी विमानातून खाली आलो तेव्हा मला सांगण्यात आले की मी जाऊ शकत नाही. मला का थांबवले जात आहे हे मला कळत नाही"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर पवन खेडा हे अलिकडे चर्चेत आले होते. खेडा यांच्याविरोधात भाजपने तक्रारही दाखल केलेली आहे. अदानीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेताना खेडा यांनी वादग्रस्त भाषा वापरली होती. जर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जेपीसीची स्थापना करु शकतात, तर मग नरेंद्र 'गौतम दास' मोदी यांना काय समस्या आहे, असे खेडा म्हणाले होते. पत्रकारांनी त्यावेळी तुम्ही पंतप्रधानांच्या वडिलांचे चुकीचे नाव घेत आहात, असे सांगितले असता पंतप्रधानांच्या वडिलांचे नाव जरी 'दामोदर दास' असे असले तरी त्यांचे काम 'गौतम दास' सारखे आहे, असा टोमणा मारला होता.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT