पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून जुनेद मोहोम्मद या तरुणाला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. काश्मीर मधील अतिरेकी संघटनेकडून फांडींग झाल्याचा आरोपावरून ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. पुणे न्यायालयात आज दुपारी त्याला हजर करण्यात येणार आहे.
जुनेद याची गेल्या आठ दिवसापासून दहशदतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरु होती. दरम्यान त्याचा या प्रकरणात सहभाग आढळून आल्याने त्याला आज पहाटे पथकाने दापोडी परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुनेद मोहम्मद हा जम्मू काश्मीर येथील प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर ए तोएबाच्या सक्रिय सभासदांच्या संपर्कात होता. त्याच्या मदतीने वेगवेगळ्या राज्यातील तरुणांना लष्कर ए तोएबा या संघटनेत भरती करून त्यांना आतंकवादी कारवाया करण्याचे प्रशिक्षण देण्याकरता जम्मू काश्मीर येथे नेण्याचा प्रयत्न तो करत होता. या कामाकरिता त्याला जम्मू काश्मीर येथील एका खात्यावरून त्याच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याशिवाय तो वेगवेगळ्या व्हाट्स अप ग्रुप व फेसबुकद्वारे राष्ट्रीय सुरक्षिततेला बाधा होईल अशा चिथावणीखोर पोस्ट करुन भागातील धार्मिक ऐक्य आणि जातीय सलोखा धोक्यात आणून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. हे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.