Latest

MVA rally : मुबंई तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे करु; उद्धव ठाकरेंचा इशारा

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचे वस्त्रहरण थांबविण्यासाठी महाविकास आघाडीच्या या वज्रमुठीचा ठोसा देण्याची वेळ आली आहे. आता मुंबई महापालिका येऊ द्या, विधानसभा येऊ द्या किंवा लोकसभेसोबत या तिन्ही निवडणुका घ्या; तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला. अमित शहांना जमीन काय असते ते महाराष्ट्रातली जनता दाखवून देईल, असे आव्हानही ठाकरेंनी दिले. (MVA rally)

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा सोमवारी वांद्रे येथील बीकेसी येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत झाली. या सभेतील प्रमुख भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढविला. त्याच वेळी व्यासपीठावर उपस्थित विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आदी नेत्यांनी महाविकास आघाडीत एकजूट कायम ठेवण्याच्या आणाभाका घेतल्या. (MVA rally)

मुंबईला मारत आहेत (MVA rally)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल चढवत उद्धव म्हणाले, मुंबईतून सगळी कार्यालये मुंबई बाहेर नेत आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येत नाही म्हणून मुंबईला मारण्याचे उद्योग सुरू आहेत. जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडेल त्याचे तुकडे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. यांचे सगळे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या 92 हजार कोटींच्या ठेवींवर आहे. महाराष्ट्राची लूट करणारी ही भांडवलदारी वृत्ती असून महाराष्ट्रावर सुरु असलेले अत्याचार मिंधे बघत आहेत. मिंध्यांचे हे कसले बाळासाहेबांचे विचार? मुळात बाळासाहेबांच्या विचारांचा एक कण जरी यांच्यात असता तरी त्यांनी गद्दारी केली नसती.

आमचे सरकार गेल्यानंतर या सरकारने तातडीने बीकेसीतील सोन्यासारखी जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली. किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार आहेत? आरे कारशेडला स्थगिती दिली पर्यावरणासाठी. पण केंद्र सरकार कोर्टात गेले आणि कांजूरमार्गची जागा अडवून ठेवली. मी मेट्रोची कारशेड कांजूरला करणार होतो. जागेला विरोध होता मेट्रोला नाही. आता कांजूरला पण कारशेड करणार आहेत. मी हे आधीच सांगितले होते. मग ती अडवली कशाला, केवळ मविआला श्रेय मिळू द्यायचे नव्हते, यासाठी हा सर्व अट्टहास केला गेल्याचा आरोप उद्धव यांनी केला. (MVA rally)

यापुढे तुमच्या भाषेत उत्तर

भाजपाच्या नेत्यांकडून खालच्या पातळीवर होणार्‍या टीकेवरुन उद्धव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. काँग्रेसने मला 91 शिव्या दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. त्याचा संदर्भ देत उद्धव म्हणाले, या शिव्यांचे मी समर्थन करत नाही. पण मला, आदित्यला आणि कुटुंबाला तुमचे लोक जे बोलतात तेव्हा तुम्ही का बोलत नाही? तुमची भोकं पडलेली टिनपाट जर बोलणार असतील तर मग आमचे लोक पण त्याच भाषेत बोलतील, असे त्यांनी ठणकावले.

आता शरद पवारांची भेट चालते?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी शरद पवारांच्या दबावाखाली आहे, अशी माझ्यावर टीका केली जात होती. आता बारसूत आंदोलन पेटल्यावर यांचे मंत्री उदय सामंत हे शरद पवारांना जाऊन भेटत आहेत. आता ही भेट चालते का, असा खोचक प्रश्न त्यांनी यावेळी शिंदे गटाला केला.

भागवत मशिदीत गेलेले चालतात का?

हिंदुत्वावरुन भाजप आणि शिंदे गटाकडून होणार्‍या टीकेचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मी काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेलो तर हिंदुत्व सोडले अशी टीका केली जाते. मग भागवत मशिदीत गेलेले कसे चालतात? असा प्रश्न करतानाच आता मविआसोबत हा भगवा उंच न्यायचा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे बिल्डर, कंत्राटदारांचे सरकार

गेल्या 9-10 महिन्यांपासून महाराष्ट्र अंधकारात गेला आहे. अंधकारात गेलेल्या महाराष्ट्राला बाहेर काढायचे काम आपल्याला करायचे आहे, महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे घेऊन जायचे आहे, असे आवाहन करतानाच महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसले आहे. हे बिल्डर आणि कंत्राटदारांचे सरकार आहे, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. हा थोड्या दिवसांचा खेळ आहे. हे घटनाबाह्य सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा इशाराही त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत दिला. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचे काम सुरु आहे. दिल्लीपुढे महाराष्ट्राला झुकवले जात आहे. पण हा महाराष्ट्र कदापि झुकणार नाही, मोडणार नाही, तर तो तुम्हाला मोडणारा आहे, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.

काम की बात करा!

'मन कि बात'मधून गेली अनेक वर्षे देशाला संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. देशात काल आणखी एक इव्हेंट झाला. तो म्हणजे मन की बात. या देशाचा एकमेव पंतप्रधान 9 वर्षे फक्त मन की बात करत आहेत. त्याऐवजी काम की बात करा, जनतेची बात करा, अशी जोरदार टिका करतानाच यापुढे महाराष्ट्राची ही वज्रमुठ सभा केवळ काम की बात करेल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

राऊत यांची टीका

सध्या विरोधात, परखड, सत्य बोलले कि आत टाकले जात आहे. आंदोलन केले तरी आत टाकले जात आहे. अनिल देशमुख, छगन भुजबळ आणि मी आम्ही आत जाऊन आलोय, असे सांगतानाच दुसर्‍या बाजुला चोर, दरोडेखोर, लफंगे, भ्रष्टाचारी, देशद्रोही, देश लुटणारे, बँका लुटणारे हे तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे, स्वच्छ करायचे आणि आपल्या पक्षात घ्यायचे, असा यांचा धंदा सुरु आहे, अशा शब्दात राऊत यांनी भाजपावर घणाघाती टिकाही केली.

मुंबई लढून मिळवली

उद्धव आपल्या भाषणात म्हणाले, महाराष्ट्राने रक्त सांडून, बलिदान देऊन आपली हक्काची राजधानी मिळवली आहे. मुंबई आंदण मिळालेली नाही, तर लढून मिळवलेली राजधानी आहे. रविवारी मध्यरात्री बारा वाजताच मी, आदित्य आणि आपले शिवसैनिक हुतात्मा स्मारकावर जाऊन अभिवादन करून आलो. पण तेथे सरकारकडून कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती. शेवटी शिवसैनिकांनीच सजावट केली.

मी बारसूत येतोय

बारसूमध्ये येऊन दाखवा, असे आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी दिले. ते स्वीकारत येत्या 6 मे रोजी आपण बारसू येथे जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. यादिवशी महाडमध्ये सभा असून, या सभेपूर्वी बारसूतील स्थानिक नागरिकांची आपण भेट घेऊ, असे ते म्हणाले. बारसूबाबत आपणच पत्र दिले असल्याचे शिंदे-फडणवीस सरकार सांगत आहे. पण, मी जागा सुचवली होती, माझ्या पत्रात लोकांवर अत्याचार करा असे लिहिले नव्हते. बारसूच्या लोकांनी मान्यता दिली तरच रिफायनरी असे आपले धोरण होते आणि आजही आहे याची उद्धव यांनी पुन्हा आठवण करून दिली.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT