Latest

नागपूरमध्ये भीषण अपघात, कारची ट्रकला धडक, ६ ठार

निलेश पोतदार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर-उमरेड मार्गावर विहीरगाव जवळील अड्याली फाट्याजवळ तवेरा कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपूर – उमरेड मार्गावर विहीरगाव जवळ भरधाव तवेरा कारने ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातामध्ये तवेरा कार चक्काचूर झाली. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिलेसह पाच पुरुषांचा समावेश आहे. तर एक जण जखमी आहे. उशीरा मध्यरात्री हा अपघात झाला. मृतकांची ओळख पटविण्यात येत आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये कारच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला.

या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, तवेरा गाडी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान उमरेडकडून नागपूरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी उमरगाव फाट्याजवळ तवेरा गाडीच्या चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तवेराचा वेग जास्त असल्याने त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले आणि तवेरा ट्रकच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळ हे उमरेड मार्गावर असल्याने कुही आणि उमरेड ठाण्याचे पोलीस स्टाफ घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र घटनास्थळ हे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हुडकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

एक बालिका बचावली : 

ट्रक आणि भरधाव तवेरा गाडीत झालेल्या अपघातात एक छोटी बालिका वाचली आहे. मात्र ती गंभीर जखमी असल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
सागर शेंडे रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (तवेराचालक), मेघा आशिष भुजाडे रा. नझूल ले-आउट बेझनबाग, देविदास गेडाम, नरेश डोंगरे रा. भीमचौक, इंदोरा अशी मृतांची नावे असून, उर्वरितांची नावे कळू शकली नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, चालक सागर शेंडे हा एमएच ३१ – सी ४३१५ क्रमांकाची तवेरातून प्रवासी घेऊन नागपूरकडे परतत होता. रात्रीची वेळ असल्याने चालकाने तवेराचा वेग फारच वाढविला होता. एमएच ४० – बीजी ७७५७ क्रमांकाचा टिप्पर रस्त्याच्या कडेला उभा होता. ही बाब जीपचालकाच्या वेळीस नजरेस पडली नाही. टिप्पर उभे असल्याचे लक्षात येताच चालकाने करकचून ब्रेक लावला. मात्र वेग फार अधिक असल्याने जीप अनियंत्रित होऊन टिप्परवर धडकली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT