Latest

UPSC 2022 : साळशीचा आशिष ‘यूपीएससी’त दुसऱ्यांदा चमकला

अविनाश सुतार

बांबवडे: पुढारी वृत्तसेवा: साळशी (ता. शाहूवाडी) येथील आशिष अशोक पाटील यांनी संघ (केंद्रीय) लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2022) नागरी सेवा परीक्षेत (४६३ रँक) दुसऱ्यांदा लखलखीत यश मिळवले आहे. याआधी त्यांनी मे २०२२ च्या निकालात ५६३ रँक मिळवली होती. आशिष सध्या उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. यंदाच्या यूपीएससी परीक्षेत १०० रँकची सुधारणा करून त्यांनी पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेतील 'शाहूवाडी पॅटर्न'चा यशाचा डंका वाजवला आहे.

विशेषतः आशिष याने मराठी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षणाचा श्रीगणेशा केलेला आहे. मात्र, इंग्रजी भाषेची निवड करून यूपीएससी परीक्षेला (UPSC 2022) सामोरे जात त्याने एकदा नव्हे तर दोनदा यशाचा झेंडा फडकावला आहे. सुधारित रँकमुळे आशिषला अपेक्षित प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी पद खुणावत आहे. आईवडीलांचे संस्कार आणि गुरुजनांनी दाखविलेला मार्ग हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे निसंदिग्ध मत आशिष पाटील यांने 'दै. पुढरी'शी बोलताना व्यक्त केले आहे.

साळशी (ता. शाहूवाडी) या मूळ खेडेगावात वाढलेला आशिष हा अशोक बाळू पाटील या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा मुलगा. कडवे केंद्रातील वीरवाडी शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेता घेता आशिष याने चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावून आपल्यातील गुणवत्तेची चुणूक दाखविली. सुपात्रे हायस्कूलमध्ये पूर्व माध्यमिक टप्प्यावर सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही राज्याच्या यादीत अग्रक्रमाने झळकला. तर महात्मा गांधी विद्यालय, बांबवडे येथे दहावी शालांत परीक्षेत (सन २०१३) ९७ टक्के गुण प्राप्त केले. याचवेळी आशिषने सातत्यपूर्ण यशाचा आलेख उंचावत 'एनटीएस'या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवले. पुढे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शासकीय महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विषयातून विशेष श्रेणीतून पदवी (२०१९) मिळवली. गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकरीची संधी मिळूनही आशिषने स्पर्धा परिक्षेचा मार्ग निवडला.

दरम्यान, २०२० ची नागरी सेवा प्राथमिक परीक्षा तो पास झाला. मात्र मुख्य परीक्षेत त्याला थोडक्यात अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने २०२१ च्या यूपीएससी परीक्षेत ५६३ रँक प्राप्त करून अपयश धुवून काढले. तर यूपीएससीने आज जाहीर केलेल्या निकालात आशिषने ४६३ वी रँक प्राप्त केली. त्याच्या यशामध्ये गृहिणी असणारी आई, वडील अशोक पाटील, माध्यमिक शिक्षक ए. ए. पाटील तसेच प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे आशिष याने सांगितले.

यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, आणि समाधान हा शब्द यशात अडथळे निर्माण करतो, हे सुरुवातीपासून मनावर बिंबवले होते. त्यादृष्टीने ध्येय निश्चित केले आणि यूपीएससीची झपाटून तयारी केली. विशेषतः नागरी सेवा परीक्षेचे उपलब्ध साहित्य पाहता इंग्रजी भाषेचा पर्याय निवडून पूर्वतयारीने परीक्षेला सामोरा गेलो. साहित्य वाचनाचा छंदही यशामध्ये कामी आला.
– आशिष पाटील

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT