Latest

नाशिकमध्ये चार महिन्यात तब्बल 500 टन भगरीचे उत्पादन 

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अधिक महिना, श्रावण, गणपती उत्सव, नवरात्र या कालावधीत अनेक व्रत वैकल्ये केली जातात. त्यामुळे बाजारात भगरीला सर्वाधिक मागणी असते. एकट्या नाशिकमध्ये ४० भगर मिल असून, इतर महिन्यांच्या तुलनेने जून ते सप्टेंबर काळात महिन्याला भगरीचे १२५ टन भगरीचे उत्पादन हाेते. इतर महिन्यांत ७० ते ७५ टक्के, तर वर्षाला १५०० टन भगरीचे उत्पादन केले जाते.

नाशिकमध्ये ७५ वर्षांपासून भगर इंडस्ट्री आहे पण हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असल्याने भारतात नाशिकची ओळख आता 'भगर हब' म्हणून होत आहे. शिवाय नाशिकमधून इतर राज्यांतील सण परंपरानुसार गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश राज्यात भगर निर्यात केली जाते. साबुदाण्यापेक्षा भगर महाग असून ११२ रूपये किलोप्रमाणे सध्या बाजारात मिळत आहे. पेठ, हरसूल, सुरगाणा, जव्हार, त्र्यंबकेश्वर, मोखाडा, पेण, पनवेल या भागातून चांगल्या दर्जाचा भगरीसाठीचा लागणारा कच्चा माल मिळतो. त्यानंतर मिलमध्ये आल्यावर काडी, कचरा, माती वेगळी करून अत्याधुनिक यंत्रणेने भगर स्वच्छ केली जाते. भगरवरील साल काढल्यानंतर ती खाण्यायोग्य बनते. त्यासाठी कोणत्याही फवारणी आवश्यकता भासत नाही.

तृणधान्यांना नियमित मागणी 

हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्याने व लोक आता आहाराच्या बाबतीत अधिक जागृत झाल्याने तृणधान्यांना बाराही महिने मागणी वाढली आहे. कधी काळी तृणधान्यांना गरिबांचे अन्न म्हणून ओळखले जायचे, तर भगर फक्त उपवासाला खाल्ली जात होती. आता वाढत्या आजारपणांमुळे लोक खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असल्याने ग्लुटेन फ्री अन्न म्हणून ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर सारख्या तृणधान्यांचा आहारात पसंती देत आहेत.

आता बाराही महिने तृणधान्यांना मागणी असते. परंतु जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत व्रतवैकल्य अधिक केले जात असल्याने इतर महिन्यांच्या तुलनेने चार महिन्यांत भगरीचे अधिक उत्पादन केले जाते.

-सिद्धार्थ जैन, मॅजिक मिलेट्स

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT