Latest

Election Commissioner: सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंह संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली आहे. अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार हे एकच निवडणूक आयुक्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्रिसदस्यीय समितीने या नावांची निवड केली आहे. या दोन्ही नावांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंतिम निर्णय घेतील. आणि त्यानंतर या संदर्भातील अधिसूचना काढण्यात येईल. मात्र नावे निवडण्याच्या या एकूण प्रक्रियेवरून काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणूक आयुक्तांची दोन रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय बैठकीत ज्ञानेश कुमार, सुखबीरसिंह संधू, उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदिवर पांडे, सुधीरकुमार गंगाधर रहाटे या सहा नावांवर चर्चा झाली होती. त्यापैकी ज्ञानेश कुमार, सुखबीरसिंह संधू या दोन नावांवर समितीने शिक्कामोर्तब केले.

अरुण गोयल हे देशाचे निवडणूक आयुक्त होते. मात्र त्यांनी ९ मार्चला अचानक तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूरही केला. त्यापूर्वीच अनुप पांडे निवडणूक आयुक्त म्हणुन फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगात केवळ मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे एकमेव आयुक्त होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण तयारीची जबाबदारी ही त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर येणार होती. या पार्श्वभूमीवर नव्या आयुक्तांची निवड महत्त्वाची मानली जाते. दरम्यान, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या त्रिसदस्य समितीच्या या पहिल्याच नियुक्त्या आहेत. सरन्यायाधीशांव्यतिरिक्त निवड समितीमध्ये आता पंतप्रधान आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसेच विरोधी पक्षनेते यांचा समावेश आहे.

कोण आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंह संधू?

निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेले ज्ञानेश कुमार हे केरळमधील तर सुखबीरसिंह संधू हे पंजाब मधील आहेत. ज्ञानेश कुमार हे १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी गृह मंत्रालयात काम केले आहे. कलम ३७० संदर्भात निर्णय घेताना ते गृहमंत्रालयात कार्यरत होते. त्यासोबतच सुखबीरसिंह संधू हे उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राहिले आहेत.

अधीर रंजन चौधरींनी व्यक्त केली नाराजी?

लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी मात्र या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. माझ्याकडे २१२ नावे एक दिवसापूर्वी दिली होती, त्यामुळे त्या नावांवर मी रात्रभर विचार केला. दुसऱ्या दिवशी सहा नावे माझ्याकडे दिली. त्यामुळे आपण या प्रक्रियेबाबत असंतुष्ट असल्याचे सांगत स्पष्ट नाराजी अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT