पुढारी ऑनलाईन डेस्क : Andhra Politics : आंध्र प्रदेशमध्ये २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज, (दि. ७) बुधवारी राज्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला. २४ मंत्र्यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे राजीनामे सुपुर्त केले आहेत. मुख्यमंत्री रेड्डी संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात एक-दोन जुन्या चेहऱ्यांनाच स्थान दिले जाणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत प्रचंड विजय मिळविल्यानंतर, जगन रेड्डी यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अर्ध्या कालावधीत संपूर्णपणे नवीन मंत्रिमंडळ निवडण्याची घोषणा केली असता, हा बदल होण्याची दाट शक्यता होती. मंत्रिमंडळातील हा फेरबदल गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच होणार होता, मात्र कोरोनामुळे तो पुढे ढकलावा लागला होता. (Andhra Politics)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी ६ एप्रिल रोजी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान त्यांनी त्यांच्या आगामी योजनेची माहिती दिली आहे. त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची अंतिम यादी घेऊन ते गुरुवारी पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहेत. (Andhra Politics)
सध्याच्या मंत्रिमंडळात पाच उपमुख्यमंत्री होते. ते अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास जाती, अल्पसंख्याक आणि कापू समुदायाचे प्रतिनिधित्व करत होते. तसेच मंत्रिमंडळात चार रेड्डी, सात ओबीसी, पाच एससी आणि एक एसटी आणि एक मुस्लिम यांच्यासह विविध जातीचे ११ मंत्रीही होते. २०२४ मध्ये होणार्या आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळातील बदल महत्त्वपूर्ण असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. राज्यात जातीय समतोल साधण्याचा त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री रेड्डी पुन्हा एकदा पाच नवीन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरंतर हा बदल डिसेंबरमध्ये होणार होता, पण कोविड-१९ मुळे तो पुढे ढकलण्यात आला.(Andhra Politics)