Latest

Anantnag Encounter : शहीद आशिष धौंचक अनंतात विलीन; वाढदिवसाला देणार होते Surprise पण…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत चार जवान शहीद झाले आहेत. तर आणखी दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत शहीद झालेल्या मेजर आशिष धौंचक (Major Ashish Dhaunchak) यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रे वेळी गावातील अनेक जण उपस्थित होते. आशिष यांना आपल्या वाढदिवसाला घरी येऊन कुटुंबीयांना सुखद धक्का द्यायचा होता. पण तत्पूर्वीच ते शहीद झाले. कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा करण्याची इच्छा त्यांच्या मनातच राहिली. जाणून घ्या वीरमरण पत्करलेल्या शहीद आशिष धौंचक यांच्याविषयी… (Anantnag Encounter)

Anantnag Encounter : सैन्यात जायची इच्छा…

मेजर आशिष धौंचक हे मुळचे पानिपतमधील बिंझौल गावचे रहिवासी आहेत. २३ ऑक्टोबर १९८७ रोजी जन्मलेले आशिष  हे २०१२ साली सिखलाई रेजिमेंट आर्मीमध्ये भरती झाले होते. ते राजौरी, मेरठ आणि भटिंडा येथे तैनात होते. त्यांची सुमारे अडीच वर्षांपूर्वी मेरठहून काश्मीरमध्ये पोस्टिंग झाली होती. त्यांची आई कमला माध्यमांशी बोलत असताना म्हणाल्या की, आशिष यांनी सैन्यात जावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा नव्हती. मात्र, आशिष यांना लहानपणापासूनच सैन्यात जायचं होतं. त्यांच्या आवडीपोटी आईने त्यांना परवानगी दिली होती. त्यांचे वडील लालचंद एनएफएलमधून निवृत्त झाले आहेत. आई गृहिणी आहे. आशिष यांच्या पत्नीचे नाव ज्योती आणि तीन वर्षांच्या मुलीचे नाव वामिका आहे.

संबंधित बातम्या 

वाढदिवसाला घरी येण्याची इच्छा राहिली अपूर्णच…

आशिष धौंचक हे येत्या २३ ऑक्टोबरला कार्यक्रमासाठी घरी येणार होते. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाला घरी जाऊन त्यांना आपल्या कुटुंबाला सुखद धक्का द्यायचा होता. पण धौंचक यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. वाढदिवसाच्या अगोदरच ते शहीद झाले.

तीन वर्षांच्या चिमुकलीचे मायेचे छत हरवले…

आशिष धौंचक यांना तीन वर्षांची निरागस मुलगी आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून बापाच्या मायेचे छत हरवले. मेजर आशिष धौंचक हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक सुपूत्र होते. तर त्यांना अंजू, सुमन आणि ममता या तीन विवाहित बहिणी आहेत. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ शहीद झाल्यानंतर कुटुंब आणि गाव शोक सागरात बुडाला.

Anantnag Encounter : पंचतत्त्वात आज विलीन होतील

मेजर आशिष धौंचक यांच्या हौतात्म्याची बातमी ऐकून आज सर्वांचे डोळे पाणावले आहेत. त्याच्या कुटुंबीयांची अवस्था शोकाकूल झाली आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या बिंझौल या मूळ गावी आणण्यात आले. तिथे अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. अंत्ययात्रे वेळी गावातील अनेक लोक पोहोचले होते. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Anantnag Encounter : ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर नजर

अनंतनागमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरूच आहे. लष्करच्या दोन दहशतवाद्यांना सैन्याने घेरले आहे. क्वाडकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांवर नजर ठेवली जात आहे. पॅरा कमांडोजनीही कारवाईची जबाबदारी स्वीकारली आहे. घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग यामुळे हे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ज्या टेकडीवर दहशतवादी लपून बसल्याचा संशय होता तेथे रॉकेट डागण्यात आले. उझैर खानसह लष्कराच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT