Latest

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले सेफ, मात्र हर्षदाताईंची पंचायत

अमृता चौगुले

पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध झाला असून, यात शेवगाव तालुक्यात एक गट व दोन गणांची भर पडली आहे. शेवगाव शहरात नगपरिषद अस्तित्वात आल्याने गत निवडणुकीत दहिगावने, बोधेगाव, लाडजळगाव, भातकुडगाव, असे चार जिल्हा परिषद गट, तर दहिगावने, एरंडगाव, बोधेगाव, मुंगी, लाडजळगाव, खरडगाव, भातकुडगाव अमरापूर, असे आठ पंचायत समिती गण अस्तित्वात होते; मात्र होणार्‍या निवडणुकीत शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या वाढविल्याने गट गणांचे फेरबदल होऊन तालुक्यात अमरापूर व मुंगी पंचायत समिती गणांचे आता गटात रुपांतर झाले आहे, तर लाडजळगाव गट संपुष्टात येऊन, तो गण झाला आहे.

दहिगावने, भातकुडगाव, बोधेगाव गट कायम राहिले असले, तरी त्यातील गणात बदल झाला आहे. या पुनर्रचनेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले, बोधेगाव गटाच्या सदस्या संगीता दुसुंगे, भातकुडगाव गटाचे सदस्य रामभाऊ साळवे यांचे गट कायम राहिले, तर हर्षदा काकडे यांचा लाडजळगाव गट हा गण झाल्याने त्या इतरत्र गटाचा शोध घेताना दिसत आहेत. पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांचा दहिगावने गण अभेद्य राहिला असला, तरी ते जिल्ह्यात सक्रिय होण्याच्या द़ृष्टीने जिल्हा परिषद निवडणूक लढवतील असा अंदाज आहे. शेवगाव तालुक्यावर घुले बंधुंचे वर्चस्व आहे. आता आरक्षण निश्चित झाल्यावर अनेक राजकीय खलबदल होऊन खरे चित्र स्पस्ट होणार आहे.

शेवगावमध्ये बदलत्या जिल्हा परिषद गट रचनेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांचा गट शाबूत राहिला असून, हर्षदा काकडे मात्र नवीन गटाच्या शोधात आहेत. या तालुक्यात एक गट व दोन गण वाढल्याने आता जिल्हा परिषदचे पाच गट, तर पंचायत समितीचे 10 गण झाले आहेत.

तालुक्यात भाजपचा प्रभाव कमीच

तालुक्यात भाजप तोकडा पडत असल्याने त्यांचा गत निवडणुकीत येथे शिरकाव झाला नाही; मात्र यावेळी ते जोरदार तयारीत आहेत, तर जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे वेगवेगळ्या गटातून निवडून आल्याने ते आता कोणती खिंड लढणार याकडे लक्ष लागले आहे.

एक नजर बदलावर

हर्षदा काकडे यांचा लाडजळगाव गट संपुष्टात आला आहे. अमरापूर आणि मुंगी हे दोन नवे गट अस्तित्वात आले आहे. लाडजळगाव हा गण असणार आहे.

SCROLL FOR NEXT