Latest

मंचर येथे ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला ; पाच दरोडेखोर जेरबंद

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  मंचर (तगाव) येथील उत्तम भाग्य ज्वेलर्सवर दरोडा टाकून सात दरोडेखोरांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरीचा प्रयत्न बुधवार (दि. ८) पहाटे घडला. पोलिस व स्थानिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी येऊन पाच दरोडेखोरांना जेरबंद केले असून दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंचर उत्तम भाग्य ज्वेलर्स येथे चोरी करण्यासाठी दरोडेखोर आल्याची माहिती मंचरचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांना कळली. त्यांच्यासह रात्रगस्त घालणारे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी आले.

संबंधित बातम्या :

पोलिसांची चाहूल लागताच पाच दरोडेखोर ऐवज घेऊन शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर गेले, तर दोन चोरटे आलेल्या मार्गाने पळून गेले. बाजारपेठेतील नागरिक, काजीपुरा येथील तरुण तसेच परिसरातील महिला, पुरुष यांनी मोठ्या संख्येने मदतीसाठी येऊन परिसराला वेढा घातला. गिरीशशेठ समदडिया यांच्या इमारतीच्या गच्चीवर लपलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडे कोयता, कटावणी, गॅस कटर, गॅस गन व एक बनावट पिस्तूल मिळाले आहे.

वैभव बाळू रोकडे (वय २४, रा. नागाचा खडक मुरबाड), गणेश रामचंद्र टोके (वय २६, रा. नडे, ता. मुरबाड), अजय सखाराम भिसे (वय २०, रा. कलगाव, ता. शहापूर), ग्यानसिंग भोला वर्मा (वय २३, रा. घोडबंदर रोड ठाणे) आणि मोहम्मद अरमान दर्जी (वय २३, रा. नेहरूनगर कुर्ला) या दरोडेखाेरांना पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. इतर दोघे फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिस पथकाच्या या कामगिरीबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. पोलिस निरीक्षक बळवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलिस कर्मचारी तानाजी हगवणे, नंदकुमार आढारी, होमगार्ड फैजल खान, अर्जुन ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

अशी घडली घटना

मंचर शहराच्या बाजारपेठेत भरवस्तीत उत्तम भाग्य ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मागील एक महिन्यापासून या दुकानाची रेकी दरोडेखोरांनी केली होती. रात्री मालक अभिजीत समदडिया दुसऱ्या मजल्यावर तर त्यांची आई, मुलगा आणि मुलगी हे पहिल्या मजल्यावर झोपले होते. बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजता सात दरोडेखोर ड्रेनेजच्या पाईपवरून तीन मजली इमारतीवर चढले. वरील दरवाजा तोडून जिन्याने ते खाली असलेल्या सोने-चांदीच्या दुकानात आले. दुकानाचे सायरन बंद करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड फिरवण्यात आले. दुकानातील १८ किलो ७१० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच २ लाख २२ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी पिशव्यांमध्ये भरून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. ऐवज घेऊन परत जाताना एका दरोडेखोराचा धक्का पहिल्या मजल्यावरील दरवाजाला लागला. आत झोपलेला यश याला वडील आले असावेत असे समजून त्याने दरवाजा उघडला.

त्यावेळी हातात कोयता, कटावणी घेऊन दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. यश पळत आजीच्या खोलीत गेला. त्यावेळी झोपलेल्या व्यक्तीकडे दरोडेखोराने मोर्चा वळविला. जैन कुटुंबीयांनी धाडस दाखवत एका दरोडेखोराला लाथ मारली. दुसऱ्याने तिचे तोंड दाबले असता तिने त्याच्या हाताचा चावा घेतला. ललिता समदडिया यांना दमदाटी करत तुमच्या घरात रोख रक्कम आहे, आम्ही महिन्यापासून वॉच ठेवला आहे, लॉकरची चावी द्या अशी मागणी केली. मात्र ललिताबाई यांनी चावी नसल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी तिघांना आतील रूममध्ये बांधून ठेवले, तसेच तेथील सोन्याचे दागिने ताब्यात घेतले.

या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या अभिजीत समदडिया यांना झटापटीचा आवाज आला. त्यांनी मोबाईलमधील सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले. त्यावेळी दोनजण घरामध्ये उचकापाचक करत असल्याचे दिसले. दुकानावर दरोडा पडल्याचे लक्षात येताच अभिजीत समदडिया यांनी गिरीशशेठ समदडिया, नीरज समदडिया, महावीर संचेती, अमोल पारेख यांना घटना कळविली. त्यानंतर नागरिक आणि पोलिस पोहोचले आणि दरोडेखोर जेरबंद झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT