Latest

Soldiers Martyred : निजामाच्या गोळीबारात शहीद जवानांना सैन्याचे पथक देणार तुळजापूरात मानवंदना

backup backup

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : Soldiers Martyred : हैदराबादच्या निजामाने संस्थान भारतात विलीन न करता जनतेच्या विरोधात जाऊन अत्याचार सुरू केला होता. त्यामुळे जनतेने देखील हैदराबाद मुक्ती संग्राम सुरू केला. नंतर सरदार वल्लभ भाई पटेल यांनी सैन्य कारवाई केली. जवानांनी दिलेल्या लढ्याला आणि या लढ्यात शहीद झालेल्या दोन जवानांना मानवंदना देण्यासाठी भारतीय सैन्याचे एक पथक बुधवारी (दि. 13) तुळजापुरात येणार आहे.

निजामावर अॅक्शन घेतल्यानंतर, सोलापूर रस्त्याने येत भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी घाटशीळच्या खाली असलेल्या खंडोबाच्या माळावर तळ ठोकला. तिथून त्यांनी वरच्या बाजूला असलेला निजामाचा तोफखाना उध्वस्त केला. भारतीय जवान घाट चढून वर आले. निजामाच्या सैन्याची पळापळ झाली. हे सैन्य पळून जात असतानाच अचानक मागे फिरुन त्यांनी गोळीबार केला. त्यात '3 कॅव्हलरी रेजिमेंट'चे दोन जवान धारातिर्थी पडले होते. त्यांना भारतीय सैन्याकडून मानवंदना देण्यात येणार आहे.

इतिहास संशोधक प्रा. डॉ. सतीश कदम यांच्या प्रयत्नाने इतिहासात दडलेली ही शौर्याची पाने उलगडली आहेत. त्यांच्या माहितीनुसार, तुळजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागेच या दोन्ही सैनिकांच्या समाधी आहेत. अर्थात याबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती. डॉ. कदम यांच्या नजरेला हे पडल्यानंतर त्यांनी माग काढत हा लढा समोर आणला आहे. जमादार हरिराजसिंह आणि जमादार मांगेराम अशी या धारातिर्थी पडलेल्या जवानांची नावे आहेत. (Soldiers Martyred)

हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यास निजाम राजी नसल्याने सैन्य कारवाई करण्यात आली होती. 13 सप्टेंबर 1948 ला हे छोटेखानी युद्ध झाले होते. 109 तास चाललेल्या या छोटेखानी युद्धात भारतीय सैन्य दलातील '3 कॅव्हलरी रेजिमेंट'चे जवान सहभागी होते. घाटशीळच्या खाली असलेल्या खंडोबा माळावर भारतीय सैन्य होते. तर घाटशीळच्या वरच्या परिसरात (डोंगर) निजामाचा तोफखाना होता. भारतीय सैन्यावर त्यांनी छोट्या तोफा रोखल्या होत्या.

अखेर भारतीय सैन्याने बाँबच्या साह्याने निजामाचा तोफखानाच उध्वस्त केला. त्यानंतर निजाम सैन्य मागे फिरले. भारतीय जवानांनी घाटरस्त्याने चढाई केली. तुळजापूर शहरातील चौकापर्यंत सैन्याने धडक मारल्यानंतर पळून जाणार्‍या निजामी सैन्याने अचानक मागे फिरुन गोळीबार केला. त्यात अगदी पुढे असलेले जमादार हरिराज सिंह आणि जमादार मांगेराम (हरियाणा) हे दोन्ही जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याच्या स्मृती जपण्यासाठी तुळजापुरातील या चौकात दोघांच्याही समाध्यांचे बांधकाम तेव्हाच झाले. (Soldiers Martyred)

मात्र, काळाबरोबर स्मृतीही दडल्या गेल्या. प्रा. डॉ. कदम यांच्या अथक प्रयत्नाने या दोन्ही जवानांच्या शौर्याला उजाळा मिळाला आहे. आता या समाधी तसेच परिसराचे नुतनीकरण करण्यात आले आहे. या दोघांचेही वारस सैन्य दलातच होते. ते आता सेवानिवृत्त झाले आहेत. मांगेराम यांचे नातू सुनील मलहान (नौदलातून सेवानिवृत्त) तर हरिराजसिंह यांचा मुलगा निवृत्त कर्नल वीरेंद्रसिंह हेही येणार आहेत. भारतीय सैन्याची एक तुकडी 13 सप्टेंबरला सकाळी येथे येऊन सकाळी साडेनऊ वाजता मानवंदना देणार आहे. त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

या दोन्ही वीरपुत्रांच्या वारसांशी संपर्क झाला आहे. तेही येणार आहेत. शिवाय सैन्य दलाचे 10 ते 12 जणांचे पथक येणार आहे. यात 10 जवान आणि दोन कर्नल दर्जाचे अधिकारी असणार आहेत. (Soldiers Martyred)

– प्रा. डॉ. सतीश कदम,
इतिहास संशोधक, धाराशिव.

Proff. Satish Kadam

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT