Latest

अमित शहा यांना गणरायाने देश हिताचे काम करण्याची सदबुद्धी द्यावी : नाना पटोले

अमृता चौगुले

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बिकट झाले आहेत. परंतु, केंद्रातील मोदी सरकारकडून या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. उलट इतर मुद्दे पुढे केले जात आहेत. देशाची अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी मंत्री जितू पटवारी यांनी दिली.

गांधी भवन येथे भारत जोडो पदयात्रेची माहिती देताना जितू पटवारी म्हणाले की, ही पदयात्रा १२ राज्ये व २ केंद्र शासित प्रदेशातून १५० दिवसात ३५०० किलोमीटरची असेल. यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध समाज घटकांशी संवादही साधणार आहेत.

दरम्‍यान, १० टक्के लोकांकडे ५० टक्के संपत्ती व ५० टक्के लोकांकडे १० टक्के संपत्ती अशी विषमता देशात वाढीस लागली आहे. २७ कोटी लोक पुन्हा दारिद्र्यरेषेच्या खाली गेले. ८० कोटी लोकांना केंद्र सरकार मोफत राशन देत आहे, ही भयानक परिस्थिती झाली आहे. देशातील आर्थिक विषमता, सामाजिक विभाजन, अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, राजकीय केंद्रीकरण आदी मुद्द्यांवर या यात्रेदरम्यान जनतेशी चर्चा केल्‍या जाणार आहेत. देश सर्व जाती धर्माचा असून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम मागील काही वर्षात केले जात आहे. देशाची ही एकता पुन्हा कायम ठेवण्यासाठी भारत जोडो यात्रा करण्यात येणार आहे, असे पटवारी म्‍हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधी यांनी १९४२ साली चले जावचा नारा दिला आणि अख्खा देश एकवटला होता. आता पुन्हा एकदा जुलमी सरकारच्या विरोधात एक होण्याची वेळ आली आहे. माणसा माणसांमध्ये भेद करण्याचे, विषमतेचे, द्वेषाचे राजकारण मागील काही वर्षांपासून वाढीस लागले असून याला छेद देऊन एकोपा निर्माण करण्याची गरज आहे.

लोकशाही, संविधान धोक्यात आले आहे, अशावेळी देशाच्या एकतेसाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची असून त्यासाठीच भारत जोडो यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही यात्रा देगुलर येथे ७ नोव्हेंबरला सुरू होईल व नांदेड मार्गे पुढे १६ दिवसात ३८३ किमीचे अंतर राज्यातून पार करेल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने आणखी दोन दिवस महाराष्ट्रात या यात्रेचा कार्यक्रम वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भाजपाच्या राज्यात देशातील सामाजिक, राजकीय वातावरण बिघडले आहे. देशाच्या सीमा सुरक्षीत नाहीत. भारताच्या सीमेत चीनने घुसखोरी केली आहे. जम्मू काश्मिरच्या निवडणुका अजून घेतल्या जात नाहीत, काश्मिरी पंडितांच्या हत्या वाढल्या आहेत. देशातील जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे. देशाची सुरक्षितता व देशातील ज्वलंत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. गणराया अमित शहा यांना देश विकण्याची नाही तर देशहिताचे काम करण्याची सदबुद्धी देवो हीच आमची प्रार्थना आहे असा टोलाही पटोले यांनी लगावला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT